रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपचा ‘गुजरात पॅटर्न’

रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपचा ‘गुजरात पॅटर्न’

देवरूख - आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत रत्नागिरी जिल्ह्यातील ५ पैकी किमान २ मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रदेश भाजपने रत्नागिरी जिल्ह्यात गुजरात पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली आहे.

गुजरातच्या धर्तीवर जिल्ह्यात ‘एक बूथ ३० यूथ’ अभियान सुरू करण्यात आले असून यासाठी प्रदेश स्तरावरून पक्षविस्तारक जिल्ह्याच्या नऊही तालुक्‍यात कार्यरत झाले आहेत.

जिल्ह्यात खेड - दापोली, गुहागर - चिपळूण, चिपळूण - संगमेश्‍वर, रत्नागिरी - संगमेश्‍वर, राजापूर - लांजा - संगमेश्‍वर असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी उत्तर रत्नागिरीत राष्ट्रवादीचे २ तर दक्षिण रत्नागिरीतील तीनही आमदार शिवसेनेचे आहेत. जिल्ह्यात यापूर्वी भाजपचे गुहागर आणि रत्नागिरी असे दोन बालेकिल्ले होते. मात्र गेल्या १० वर्षांत दोनही मतदारसंघ भाजपकडून गेले असून यातील एकावर राष्ट्रवादी, तर एकावर सेनेचे वर्चस्व आहे. गेलेले दोन मतदारसंघ परत आणण्याबरोबरच नव्या दोन ठिकाणी भाजपचे कमळ फुलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

सध्या सुरू असलेल्या गुजरात रणधुमाळीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशाने प्रथमच एक बूथ ३० यूथ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचीच अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात करण्याचे आदेश प्रदेश स्तरावरून देण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्‍याला एक पक्ष विस्तारक नेमण्यात आला असून हे पक्ष विस्तारक गेल्या आठवड्यात जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यापूर्वीच भाजपने बूथ विस्तार योजना राबवली होती. त्याची पुढची पायरी म्हणून एका बूथवर ३० कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून संपूर्ण मतदारसंघात भाजपचे कमळ घराघरात पोहोचवण्याची तयारी सुरू झाली आहे.

या कार्यकर्त्यांद्वारे केंद्र आणि राज्य सरकारची लोकोपयोगी कामे सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून कमळ निशाणीचा प्रचारही करण्यात येईल. प्रत्येक तालुकाध्यक्षांसह तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी या विस्तारकाला मदत करणार असून पुढील सहा महिने हे अभियान सुरू राहणार आहे.

नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मिळवलेली मते लक्षणीय आहेत. यात वाढ करून आगामी विधानसभेसाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रदेशस्तरावरून हे अभियान राबवण्यिात येत आहे. यासाठी विस्तारक दाखल झाले.
- बाळ माने,
जिल्हाध्यक्ष, भाजप
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com