‘प्रगती’कारक पाऊल : पितृपंधरवड्यात भात कापणी

प्रमोद हर्डीकर
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

अंधश्रद्धा बाजूला सारून अत्यंत नेमकेपणाने किफायतशीर ठरणारा निर्णय घेण्याचे धाडस वाटद येथील शेतकरी महिलेने दाखवले आहे. पितृपंधरवड्यात अनेक गोष्टी करू नयेत, असे सांगितले जाते. त्याला अनुसरून भात कापणीही केली जात नाही; मात्र या श्रद्धांपेक्षा पीक वेळेत हाती येण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन घरधनीण प्रगती बारगुडे यांनी हे पाऊल उचलले. 

साडवली - अंधश्रद्धा बाजूला सारून अत्यंत नेमकेपणाने किफायतशीर ठरणारा निर्णय घेण्याचे धाडस वाटद येथील शेतकरी महिलेने दाखवले आहे. पितृपंधरवड्यात अनेक गोष्टी करू नयेत, असे सांगितले जाते. त्याला अनुसरून भात कापणीही केली जात नाही; मात्र या श्रद्धांपेक्षा पीक वेळेत हाती येण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन घरधनीण प्रगती बारगुडे यांनी हे पाऊल उचलले. 

रत्नागिरी जिल्ह्यात कडक उन्हामुळे हळव्या भात पिकाला धोका निर्माण झाला आहे. पितृपक्ष सुरू आहे. पीक वेळीच कापले नाही तर दाणे झडून मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच हळवे पीक कापण्याचा निर्णय घेऊन शेतकरी शेतात उतरला. आज वाटद गावचे शेतीनिष्ठ शेतकरी संतोष शंकर बारगुडे यांनी कातळावरील भात पिकाच्या कापणीला सुरवात केली. विशेष म्हणजे पितृपक्षात भातकापणी करीत नाहीत, मात्र संतोष यांच्या पत्नी सौ. प्रगती (माजी सरपंच) या सुशिक्षित आहेत. लोंबी गळून नुकसान होईल, हे ओळखून त्यांनी भात कापण्याचा आग्रह धरला. तो घरातल्यांनी मान्यही केला. पितृपक्षात घर धान्याने भरले तर पितराना दुःख नव्हे, तर आनंदच होईल असा युक्तिवाद त्यांनी केला आणि तो पती आणि सासू यांनाही पटला. त्यामुळे कापणी सुरू झाली. प्रगती नावाप्रमाणेच एका ग्रामीण महिलेने अंधश्रद्धा बाजूला ठेवून अत्यंत व्यवहारिक आणि शेती उत्पन्न हातात येण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलल्याने त्यांचे कौतुकच होत आहे. 

कोकणात अंधश्रद्धेचे प्राबल्य असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतही व्यवहारापेक्षा अंधश्रद्धा महत्त्वाची ठरते. कवळ तोडणीपासून ते कापणीपर्यंत शेती असो अथवा बागायती, वेगवेगळ्या श्रद्धांना अग्रस्थान व व्यावहारिक अथवा किफायतशीर ठरणारा निर्णय घेतला जात नाही. पेरणीचे मुहूर्त पावसापेक्षा नक्षत्रावर बघितले जातात.

भाजावळ करण्याचा अट्टहास केला जातो. अशा प्रथांना प्रगती यांच्यासारख्या महिलांनी विरोध केला, तर शेती आणि शेतकरी कुटुंबाचे पाऊल सुधारणांच्या वाटेवर पडेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.