चौपदरीकरणाबाबत गडकरींची घोषणा फसवी - हुसेन दलवाई

चौपदरीकरणाबाबत गडकरींची घोषणा फसवी - हुसेन दलवाई

चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या एकाही कंपनीने रस्ते दुरुस्तीचे काम केले नाही. पुलांची कामे निधीअभावी बंद पडली आहेत. चौपदरीकरणाचे कामही प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. त्यामुळे केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणाबाबत केलेली घोषणा फसवी ठरल्याचा आरोप कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केला. 

येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दलवाई म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ज्या कंपन्यांना देण्यात आले. त्याच कंपन्यांनी चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करायचे कबूल केले होते. त्यासाठी येणारा खर्चही शासनाकडून दिला जाणार आहे. परंतु संबंधित एकाही कंपनीने पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची इतकी वाईट अवस्था मी कधीही पाहिली नव्हती. पूर्वी घाटामधील रस्ते चांगले होते. आता तेही चांगले राहिलेले नाहीत. पनवेलपासून चिपळूणला येईपर्यंत कमरेला पट्टा लावावा लागतो. अपघातांमध्ये अनेकांचे जीव जात असताना सरकारला त्याची काळजी नाही, असा आरोपही दलवाई यांनी केला. 

भाजपचे नेते रेटून खोटे बोलत आहेत. भाजप सरकारने 2018 पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल असे सांगितले होते. 2017 संपायला आला तरी चौपदरीकरणाचे काम सुरूही झालेले नाही, असेही दलवाई म्हणाले. 

चौपदरीकरणाची घोषणा झाली तेव्हा मी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीकरणासाठी निधी कुठून आणणार याची विचारणा केली. तेव्हा गडकरी म्हणाले, देशातील रस्ते विकासासाठी मी शासनाचा निधी वापरत नाही. त्यासाठी बॅंकांकडून कर्ज घेण्याची योजना आहे. देशातील अनेक बॅंका थकीत आहेत. त्यामुळे कोणतीही बॅंक कर्ज देण्यास तयार नाही. तरीही महामार्गाच्या चौपदरीकरणाठी निधी दिला म्हणून गडकरी ओरडून सांगत आहेत. निधीअभावी पुलाची कामे बंद पडली हे याचेच द्योतक आहे, असेही दलवाई यांनी सांगितले 

चौपदरीकरणाचे काम राहू द्या. भाजप सरकारकडून रस्त्याची साधी दुरुस्तीही होत नाही. महिन्याभरात रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही, तर पनवेल ते सावंतवाडीपर्यंत कॉंग्रेस सत्याग्रह करणार आहे. यासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय महामार्गा विभागाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांशी माझी बैठक झाली आहे. 

- हुसैन दलवाई, खासदार राज्यसभा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com