वाचन संस्कृतीसाठी शाळेला पाच हजारांची देणगी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

राजापूर - वाचनसंस्कृती रुजवून वृद्धिंगत करण्यासाठी झटणारे शीळचे सुपुत्र भानू गोंडाळ यांनी त्यांच्या मातोश्री कै. सावित्री केरू गोंडाळ यांच्या स्मरणार्थ जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयाला पाच हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी जुवाठी येथील ज्ञानप्रबोधिनी वाचनालयातील एका वाचकाला कै. सौ. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात येईल.

देणगीची ही रक्कम श्री. गोंडाळ यांनी नुकतीच प्रशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांच्याकडे सुपूर्द केली. तालुक्‍यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. गोंडाळ यांनी वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी विविध उपक्रम राबविले. मातोश्री कै. सावित्री केरू गोंडाळ यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून तालुक्‍यामध्ये अक्षरमित्र बाल ग्रंथालयनिर्मिती उपक्रमही त्यांनी राबविला आहे. त्यातून अनेक शाळांमध्ये त्यांनी स्वखर्चातून वाचनालये सुरू केली आहेत.

शहरातील नगर वाचनालयाला त्यांनी १५ हजार रुपयांची देणगीही दिली आहे. ही देणगीची रक्कम बॅंकेमध्ये ठेव म्हणून ठेवून त्यातून येणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून वर्षभरामध्ये विविध पुस्तकांचे वाचन करणाऱ्या दोन व्यक्तींना दरवर्षी वाचन प्रेरणा दिनी कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्कृष्ट वाचक पुरस्कार देवून गौरविण्यात येतो. असाच उपक्रम जुवाठी येथे राबविण्यासाठी श्री. गोंडाळ यांनी जुवाठी प्रशाळेला नुकतीच पाच हजार रुपयांची देणगी दिली आहे. देणगीची रक्कम सुपूर्द केली तेव्हा शिक्षक रामदास सावंत, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र मयेकर, वासुदेव भिवंदे, सुरेश गोसावी आदी उपस्थित होते. 

रद्दीतून ग्रंथालय उपक्रम
वाचनसंस्कृती रुजताना विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढावी, त्यांची अवांतर वाचनक्षमता विकसित व्हावी आदी उद्देशाने विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके यामधील विविध विषयांवरील अभ्यासपूरक लेखांचा त्यांनी संग्रह केला आहे. या लेखांच्या माध्यमातून त्यांनी ‘रद्दीतून ग्रंथालय’ हा वेगळा उपक्रमही राबविला आहे. त्याचा फायदा प्रशाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे.