स्वतंत्र विद्यापीठ चळवळीचा कोकणात बिगुल

स्वतंत्र विद्यापीठ चळवळीचा कोकणात बिगुल

चिपळूण - सातशे महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने १८५७ ला स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपला आवाज विधिमंडळापर्यंत मांडण्यासाठी चिपळुणात सभा झाली. त्यामुळे कोकणात स्वतंत्र विद्यापीठाची चळवळ सुरू झाली आहे.

विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीचे अनेक प्रसंग, उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यात होणारा विलंब, अभ्यास मंडळ व प्राध्यापकांच्या नियुक्तीस होणारा विरोध हा मूलतः विद्यापीठाचा वाढलेला अवाढव्य पसारा कारणीभूत आहे. मुंबई विद्यापीठाची स्वतःची अशी परंपरा व प्रतिष्ठा होती, परंतु अलीकडे राजाभाई टॉवरला प्रचंड धक्के सहन करावे लागत आहेत. गोव्याच्या सीमेवरील दोडामार्ग महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना ५५० कि. मी. अंतरावरील विद्यापीठाच्या कामाकरिता मुंबईला जाणे अवघड झाले आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी विविध शिक्षण संस्थाचालक एकत्र आले आहेत. 

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील १२ आमदार, येथील संस्थाचालक आणि कृती समिती यांच्यासोबत शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांची बैठक घेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. शिक्षणमंत्री कोकणातील असल्यामुळे ते कोकणला न्याय देतील. आम्हाला आंदोलन करण्याची वेळ ते येऊ देणार नाहीत. लक्षवेधीतून अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकण विद्यापीठाचा प्रश्‍न मांडणार आहे.
- राजन साळवी,
आमदार, राजापूर

रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी होत असली, तरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. सदानंद चव्हाण आणि राजन साळवी या दोन आमदारांनी कोकणातील सर्व आमदारांना एकत्र करून या विषयाची लक्षवेधी मांडण्याची ग्वाही दिली. परंतु चिपळुणात झालेल्या सभेला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव, संजय कदम गैरहजर होते. त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. सभेला उशिरा आलेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत यांच्या पाठिंब्याचे पत्र घेण्याची जबाबदारी घेतली. जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत. या लढ्यात त्यांचा सहभाग मिळणे आवश्‍यक आहे. 

विद्यापीठ होणे काळाची गरज - ॲड. पाटणे
सॅम पित्रोदा यांच्या ‘राष्ट्रीय ज्ञान आयोगा’ने देशात १५०० विद्यापीठांची गरज व्यक्त केली. आज देशात ३३२ विद्यापीठे, १३० अभिमत, ९४ खासगी तसेच इतर संस्थांची भर घातल्यास एकूण ६११ विद्यापीठे आहेत. वास्तविक कोकणसारख्या दुर्गम व सोयी नसलेल्या भागात विद्यापीठ असावे, असे आयोगाने सांगितले आहे. अलीकडेच मुंबई विद्यापीठाने कराड यांच्या एमआयटी व डी. वाय. पाटील संस्थांना सेल्फ फंडिंग विद्यापीठ सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे स्वतंत्र कोकण विद्यापीठ होणे काळाजी गरज आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांचीही चळवळ हवी - सदानंद भागवत
कोकण बोर्ड झाल्यावर येथील गुणवत्ता समोर आली. मुंबई विद्यापीठाशी ६६४ महाविद्यालये आणि १८ लाख विद्यार्थी जोडलेले आहेत. या संख्येला विद्यापीठ न्याय देऊ शकत नाही. मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र अपयशी ठरत आहे. राज्यात अन्य ठिकाणी ४० महाविद्यालये संलग्न असलेली विद्यापीठे आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मिळून कोकणात १०३ महाविद्यालये आहेत. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठाची आवश्‍यकता आहे. ही चळवळ विद्यार्थ्यांनी हाती घेणे गरजेचे आहे, असे मत देवरुखातील सदानंद भागवत यांनी 
व्यक्त केले.

शैक्षणिक विकास गतीने होईल - मंगेश तांबे
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच दक्षिण रायगडमधील चार तालुक्‍यांतील १३६ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करणे ही काळाची गरज आहे. डॉ. राम ताकवले समितीने मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची सूचना केली आहे. त्यागराजन समितीने प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ निर्माण करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक विद्यापीठात किमान १०० महाविद्यालयांचा निकषांमध्ये कोकण विद्यापीठाचा समावेश होऊ शकतो. लहान विद्यापीठांची वाढ झाल्यास विद्यापीठ अधिक कार्यक्षमतेने काम करून शैक्षणिक विकास गतीने होण्यास मदत होईल, असे नवकोकण एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे चेअरमन मंगेश तांबे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री अनुकूल दिसत नाहीत
राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी एप्रिल २०१६ मध्ये स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी सरकारकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागणीला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीला अनुकूल असल्याचे दिसत नाही. शिक्षणमंत्री विनोद तावडे कोकणातील आहेत. परंतु राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांचे हात बांधलेले असल्यामुळे स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणे त्यांच्यासमोर आव्हान आहे. 

मुख्य कार्यालयाबाबत चर्चा
सरकारने स्वतंत्र कोकण विद्यापीठाला मान्यता दिली तर त्याचे मुख्य कार्यालय कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या ठिकाणी होईल यावरून बरीच चर्चा सुरू आहे. चिपळूण हे कोकणचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे मुख्य कार्यालयाला प्राधान्य मिळावे, अशी मागणीही पुढे येत आहे. माजी आमदार (कै.) निशिकांत जोशी यांनी चिपळूण परिसरातील आपली जागा विद्यापीठासाठी देण्याचे जाहीर केले होते. परंतु ती जागा सोयीची नाही, असे काहींचे मत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com