रत्नागिरी जिल्ह्यातील मोठा सामूहिक सेंद्रिय शेती प्रकल्प कळवंडेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

चिपळूण - कृषी क्षेत्रात कोकणात आदर्श निर्माण केलेल्या तालुक्‍यातील कळवंडे येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा सामूहिक शेतीचा सेंद्रिय प्रकल्प साकारला जात आहे. कळवंडे सातीनवाडी येथे १३० एकरावर हा प्रकल्प उभा राहात आहे. गावचे मार्गदर्शक व प्रसिद्ध उद्योजक वसंत उदेग यांचा पुढाकार यासाठी महत्त्वाचा ठरला. दिशांतर संस्थेचे या प्रकल्पाला मार्गदर्शन मिळत आहे.

चिपळूण - कृषी क्षेत्रात कोकणात आदर्श निर्माण केलेल्या तालुक्‍यातील कळवंडे येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा सामूहिक शेतीचा सेंद्रिय प्रकल्प साकारला जात आहे. कळवंडे सातीनवाडी येथे १३० एकरावर हा प्रकल्प उभा राहात आहे. व्यसनमुक्‍ती, अंधश्रद्धा निर्मूलन, उनाड गुरे बंदी, चोरी बंदी, वणवा बंदी असे आदर्श उपक्रम राबविणाऱ्या या गावात सेंद्रिय भाजीपाला, फळपिकांच्या उत्पादनासह प्रक्रिया प्रकल्पही राबवला जातो. गावचे मार्गदर्शक व प्रसिद्ध उद्योजक वसंत उदेग यांचा पुढाकार यासाठी महत्त्वाचा ठरला. दिशांतर संस्थेचे या प्रकल्पाला मार्गदर्शन मिळत आहे.

राज्य शासनाने सेंद्रिय शेतीला चालना देण्याची भूमिका घेतली आहे. त्यास कळवंडे गावाने विधायक प्रतिसाद दिला. माजी सरपंच बाळासाहेब तथा तात्या उदेग यांची लष्करी शिस्त व गाव विकासातल्या ऋषितुल्य योगदानामुळे व त्यांच्या आग्रही भूमिकेचा वसा गाव जपत आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र व उद्योजक वसंतशेठ उदेग कार्यरत आहेत. पारंपरिक भाजी उत्पादकतेचा सर्वात मोठा शेती व्यवसाय करणारे कळवंडे अशी गावाची ओळख असली, तरी येथे वैयक्‍तिकरीत्या सर्व शेती होते. सातीनवाडीतील शेतकऱ्यांच्या सकारात्मक विचाराने आणि दिशान्तर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक सेंद्रिय शेतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

वसंतशेठ उदेग यांच्या योगदानाने कोकणात हा पथदर्शी प्रकल्प सुरू होणार आहे. प्रकल्पात संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने होईल. यांत्रिकीकरणाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणार असून उत्पादित मालावर येथेच प्रक्रिया करून त्याची विक्री केली जाणार आहे. शासन निर्णयापूर्वीच दिशान्तर संस्थेने सेंद्रिय शेतीची कार्यशाळा विविध प्रात्यक्षिके व औषध निर्मिती सुरू केली होती.

सेंद्रीय शेतीसाठी अभ्यास सहली, प्रशिक्षण, समूह शेतीचा संघटित निर्णय, त्याची अंमलबजावणी, श्रम तासांची सुयोग्य मांडणी, उपलब्ध यंत्रसामग्री अशा साऱ्यांची पूर्वतयारी झाली आहे. दिशांतर संस्थेतर्फे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पाणी, उपजीविका व वस्ती विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जातात. संस्थेने वेहेळे राजवीरवाडीत गतवर्षी राबवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शेती प्रकल्पाचे प्रतिबिंब कळवंडे येथे पाहावयास मिळेल, अशी अपेक्षा दिशान्तरच्या सीमा यादव व राजेश जोष्टे यांनी व्यक्त केली.

तीन शेतकऱ्यांचा गौरव
सातीनवाडीत सर्वीधिक शेती उत्पादन घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गौरव केला जातो. त्यांना बक्षीसही दिले जाते. सातीनवाडीच्या वार्षिक श्रीदत्त जयंती सोहळ्यामध्ये गतवर्षी काकडी चिबूड उत्पादनात श्री. व सौ. संध्या संतोष उदेग, मुळा-भाजी पालाभाजी उत्पादनात श्री व सौ. सुमित्रा सुरेश उदेग, ओला काजूगर प्रक्रिया उत्पादनात श्री. व सौ. अनिता अनंत उदेग या दाम्पत्यांनी अनुक्रमे एक ते तीन क्रमांक पटकाविले होते.