कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

रत्नागिरी - विविध मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने पुकारलेला रेल-रोको कोकण रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगित केला. तसेच ९ मे रोजी बेलापूर येथे होणाऱ्या बैठक घेण्यात येणार आहे.

रत्नागिरी - विविध मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने पुकारलेला रेल-रोको कोकण रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगित केला. तसेच ९ मे रोजी बेलापूर येथे होणाऱ्या बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि समस्या सुटल्याच पाहिजेत. अन्यथा आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा कृती समितीने दिला. 

कोकण रेल्वे प्रशासनाकडून वारंवार अन्याय झाल्याने रेल्वेविरुद्ध प्रकल्पग्रस्तांनी लढा उभा केला आहे. रेल्वेतील भरतीसह अन्य मागण्या मंजूर करून घेण्यासाठी प्रकल्प कृती समिती धडपडत आहे. यामध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीत सामावून घेताना प्रकल्पग्रस्तांची शैक्षणिक आणि शारीरिक क्षमतेप्रमाणे निवड करण्यात यावी व त्यांना सुयोग्य पदावर नेमणूक देऊन त्यांना त्या पदासाठी आवश्‍यक कौशल्य रेल्वेमार्फत प्रशिक्षणाच्या माध्यमातून मातृभाषेतच देण्यात यावे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी गेली अनेक वर्षांची धडपड करून लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या तसेच शारीरिक क्षमता चाचणीत यश मिळविलेले आहे. त्यांना तातडीने नवीन प्रकल्पात डी ग्रुप किंवा अन्य पदावर नेमणूक देऊन त्यांना त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रशिक्षण देण्यात यावे. प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीच्या प्रयत्नात १० ते २० वर्षे धडपड करीत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेताना वयाची अट शिथिल करण्यात यावी. कारण यापूर्वी अवलंबिण्यात आलेली भरती प्रक्रिया ही पारदर्शी नसल्याने प्रकल्पग्रस्तांची दिशाभूलच नव्हे, तर फसवणूक करून, वारंवार भरती प्रक्रियेमधील निकष बदलून-डावलून भरती प्रक्रिया राबविलेली आहे. त्यामुळे लायक व पात्र उमेदवारांवर घोर अन्याय झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांना तातडीने न्याय देणेसाठी ठेकेपद्धती बंद करून प्रकल्पग्रस्तांना भरती करून घेणे आवश्‍यक आहे. भरती प्रक्रियेची कार्यवाही रत्नागिरी या मध्यवर्ती ठिकाणाहून राबविण्यात यावी. 

कोकणातील उमेदवारांसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवावी, त्यांची लेखी परीक्षा रत्नागिरी केंद्रातच व्हावी, शारीरीक क्षमता चाचणी तसेच वैद्यकीय चाचणी देखील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील शासकीय रुग्णालयात घेण्यात यावी. निवड समितीवर मराठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, निवड समितीवर कोकणातील लोकप्रतिनिधी तसेच कृती समितीचा कमीत कमी एक तरी सदस्य असावा आदी या मागण्यांसाठी कृती समितीने आज रत्नागिरी रेल्वे स्थानकात रेल-रोको पुकारला होता. रेल रोकोच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून रेल्वे स्थानकावर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

सकाळी दहा वाजता प्रकल्पग्रस्त रेल्वे स्थानकाच्या परीसरात जमा झाले. सुमारे दोनशेपेक्षा अधिकजण एकत्र आले होते. यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कृती समितीच्या मागण्या बेलापूर कार्यालय स्तरावरच सुटणार असल्याने रत्नागिरीतील अधिकाऱ्यांनी बेलापूर येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी ९ मे रोजी कृती समितीसोबत एमडी समोरासमोर चर्चा करणार आहेत. या बैठकीतच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची तड लावण्यात यावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

Web Title: Ratnagiri News Konkan Railway Project Affected agitation