कोकणात पर्यटन विकासासाठी 45 कोटी - भुसे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम’ सुरू करण्यात आला असून कोकणात लवकरच ४५.३६ कोटी रुपयांची कामे सुरू होतील, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत पत्रकारांना दिली.

रत्नागिरी - कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम’ सुरू करण्यात आला असून कोकणात लवकरच ४५.३६ कोटी रुपयांची कामे सुरू होतील, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत पत्रकारांना दिली.

श्री. भुसे म्हणाले की, ग्रामीण कोकणातील भूमिपुत्रांना त्यांच्याच गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे. ही योजना दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यटनपूरक उद्योग उभारण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना ४ टक्‍क्‍यांवरील व १२ टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाच्या रकमेचा फरक राज्यस्तरीय समितीमार्फत मंजूर करण्यात येतो.

या कार्यक्रमांतर्गत ४५.३७ कोटींची विकासकामे प्रस्तावित असून अनेक ठिकाणची कामे सुरू झालेली आहेत. गावातून पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्याची बांधणी, विद्युत व्यवस्था, वाहनतळ यांसारखी कामे या कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आली आहेत. शासनामार्फत त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. २०१५ ला कामे मंजूर झाली, तरीही ही कामे उशिरा सुरू का झाली, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता प्रशासकीय प्रक्रियेच्या विलंबामुळे कामे सुरू होण्यास उशीर झाला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

या कार्यक्रमांतर्गत १ कोटींपर्यंतच्या छोट्या प्रकल्पांना मान्यतेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रकल्प प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रत्येकी किंमत कमाल ३ कोटी व सरासरी किंमत ५ कोटींपेक्षा अधिक नसावी. या कार्यक्रमात पर्यंटनविषयक सुविधांच्या बांधकामावर ८० टक्‍क्‍यांपर्यंतचा खर्च करण्यात येणार असून २० टक्के खर्च हा प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी, पर्यटनदृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या गावांच्या सौंदर्यस्थळांच्या बळकटीकरणासाठी करण्यात येणार आहे, असेही ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

रत्नागिरीसाठी साडेबारा कोटींची कामे
रत्नागिरी जिल्ह्यातील १२.५७ कोटी रुपयांची कामे नेवरे, निरुळ, मालगुंड, कोट, कशेळी, चुनाकोळवण, आरवली, शिगवण, पालगड, मुरुड, कर्दे, वेळणेश्वर, भाट्ये, रानपाट, वाडापेठ येथे होणार आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९.२ कोटींची कामे गिर्ये, देवबाग, भोगवे, वालावल, आंबोली, शिरोडा, रेडी आदी गावांत होणार आहेत.