गाण्यासारखा दुसरा मित्र नाही ! - कौशल इनामदार 

गाण्यासारखा दुसरा मित्र नाही ! - कौशल इनामदार 

रत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र म्हणजे गाणं. मित्रांमध्ये, समारंभात असलात तरी गाऊ शकता. आविष्कार संस्थेच्या मतिमंद विद्यार्थ्यांची गाण्याशी मैत्री झाली आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे.” असे भावोद्गार आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार यांनी काढले.

रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या इनामदार यांनी आज दुपारी आविष्कारला भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी शाळेतील आदिती बोरकर, चैतन्या मुळे, कुणाल तोडणकर, सोनम देसाई, शुभम गोतावडे, मन्नान फणसोपकर या विद्यार्थ्यांनी इनामदार यांनी संगीतबद्ध केलेली ‘हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासवे वागणे’ ही प्रार्थना म्हटली.

त्यानंतर इनामदार म्हणाले की, इथे जी मुले गात होती ती फारच सुंदर. गाणं पाठ होते याचा फार आनंद झाला आणि बाकीची मुले सुंदर ऐकत होती. तुमच्याकडे बघूनच मला भरून आले. तुम्हाला गाणे ऐकायला येतंय व ते तुम्ही ऐकू शकता. ‘भोवताली दाटला दुःखाचा अंधार जरी’ ही प्रार्थना कोण म्हणतंय याच्यावरूनही आपल्याला प्रेरणा घेता येते. गाण्यातले शब्द, भाव या मुलांना कळले नसतील पण कुठल्याही संवादाच्या पुढे जाऊन गाणं पाठ आहे ही चांगली गोष्ट. गाणं चांगलं किंवा वाईट ही पुढची गोष्ट. या मुलांकडे पाहून मला पाडगावकरांच्या ‘ज्याचे खरे न गाणे तो बेईमान’ या ओळींची आठवण झाली. आपलं गाणं लोकांपर्यंत पोहोचतंय हे या मुलांना कळलंय. ‘माणसाने माणसाशी’ हे समीर सामंतने लिहिलेले गीत सहज, साधं आहे. कुठल्याही संताला जितकं साधं लिहिणं जमतं तेवढं समीरला जमलं आहे.

त्यांनी सांगितले की, मी ‘यलो’ नावाचा चित्रपट केला होता. तो गतिमंद मुलीवर आधारित होता. त्यात पुण्याची गौरी गाडगीळ ही तुमच्यासारखीच फार गोड मुलगी आहे. तिने दोन वेळा स्पेशल ऑलिंपिकमध्ये रजतपदक मिळवले आहे. यलो चित्रपट करता दिग्दर्शक महेश लिमये यांनी सांगताना मला रॉक म्युझिक करायला सांगितले. मला वाटते स्पेशल नेहमी व यू कॅन असे गाणे आहे. मी या गाण्यांसाठी उत्साहाने पियानो वापरायचे ठरवले. पियानो दोन्ही हाताने वाजवतात. पण मला डाव्या हाताच्या बोटांनी वाजवता येत नसल्याचे कळले. डाव्या हातांनी पियानो वाजवायला त्रास होतो. गतिमंद आपणसुद्धा असू शकतो. अपंग, मतिमंद हे शब्द याच विद्यार्थ्यांसाठी नाहीत. हा चित्रपट तुम्ही नक्की पहा.

या वेळी आविष्कार शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. वैशाली जोशी, कार्यशाळा अध्यक्ष नितीन कानविंदे, कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर, अभिजित भट व अन्य शिक्षक, निदेशक, कर्मचारी उपस्थित होते.

हस्तकला शिकायला मी येणार!

ही मुले काय म्हणताहेत हे इथल्या शिक्षकांना बोलल्याशिवाय कळते, ही चमत्कार, जादूशिवाय मोठी गोष्ट वाटते. मी गाणं करतो, हा सर्वांत मोठा आशिर्वाद आहे. इथे मेणबत्त्या, शिवणकाम तुम्ही छान करता. मला ते येत नाही. पण मी लवकरच येईन आणि तुमच्याकडून शिकेन, असे इनामदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com