कोयना धरण पन्नास वर्षांत अधिक भक्कम

कोयना धरण पन्नास वर्षांत अधिक भक्कम

चिपळूण - पन्नास वर्षांपूर्वी कोयनेत भूकंप झाल्यानंतर कोयना धरणाच्या सुरक्षिततेचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ समिती नेमली गेली. समितीने सुचविलेल्या शिफारसीनुसार अनेक उपाययोजना करण्यात आल्या. भविष्यात मोठा भूकंप झाला तर त्याचे धक्के सहन करण्यासाठी कोयना धरण सज्ज आहे. असा दावा कोयना धरण व्यवस्थापन विभागाकडून केला जात आहे. 

कोयना धरणाचे बांधकाम चालू असताना संपूर्ण दक्षिण भारताचा परिसर भूकंपमुक्त म्हणून ओळखला जात होता; परंतु हे ११ डिसेंबर १९६७ ला कोयना येथे झालेल्या ६.८ रिश्‍टर स्केल इतक्‍या तीव्रतेच्या भूकंपाने खोटे ठरविले. या भूकंपामुळे धरणाच्या अनुत्सारित भागांना व अनुषंगिक कामांना नुकसान पोहोचले होते. मात्र, सांडवा भागाचे कोणतेही नुकसान झाल्याचे दिसून आले नाही. तरीही सांडव्याचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम पारंपरिक पद्धतीचे असले, तरी दोन पावसाळ्यांमधील उपलब्ध वेळ, मूळ धरण, वीजगृह व इतर बांधकामांची सुरक्षितता, प्रकल्पाच्या सर्व घटकांना कार्यरत ठेवून विशिष्ट वेळेत सर्व काम पूर्ण करण्यात आले. 

सांडवा मजबुतीकरणाच्या कामामध्ये पायाचे खोदकाम करताना धरण व पायथा विद्युतगृह यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. हे खोदकाम नियंत्रित विस्फोटन पद्धतीने झाले. या पद्धतीच्या विस्फोटाचा प्रथम अभ्यास करून नंतर मार्गदर्शक प्रणालीनुसारच काम पूर्ण करण्यात आले. धरण व विद्युतगृह यांना बसणारे प्रत्यक्ष हादरे (प्रवेग) मोजण्यासाठी दोन्ही ठिकाणी ‘मिनिमेट’ नावाची अद्ययावत उपकरणे बसवण्यात आली होती.

कोयना धरणाच्या संधानकाचे मिश्रण संकल्पन हे आय.आय.टी. मुंबई या संस्थेकडून तयार करण्यात आले. गुणवत्ता चाचण्या घेण्यासाठी कार्यक्षेत्रावरच अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली. विविध शाखांतील ४० अभियंत्यांनी यासाठी अहोरात्र सेवा दिल्या. १०४ कोटी रुपये खर्च करून हे काम करण्यात आले. त्यामुळे कोयना धरण आता पूर्णपणे भक्कम असल्याचा दावा केला जात आहे. 

कोयनेच्या परिसरात ४ रिश्‍टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तर सांडव्यातून काही प्रमाणात गळती वाढते. ती तत्काळ बंद केली जाते. भविष्यात या परिसरात मोठा भूकंप झाला तरी धरणाच्या भिंतीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही; परंतु परिसरात काळजी घ्यावी लागणार आहे.
- रज्जाक जमाते, 
टेक्‍निकल असिस्टंट, कोयना धरण व्यवस्थापन विभाग

धरणाचे बांधकाम 
कोयना प्रकल्पाच्या उभारणीची बीजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून रुजलेली आहेत. १९०० मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळानंतर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरण बांधण्याच्या संकल्पनेनेच एच. एफ. बील या इंग्रज अभियंत्याने १९०१ मध्ये सर्वेक्षण केल्याचे आढळते. १९१० साली टाटा वीज कंपनीने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. महाराष्ट्रातील वाढती विजेची मागणी लक्षात घेता १९४५ मध्ये तत्कालीन मुंबई राज्याच्या इलेक्‍ट्रिक ग्रीड डिपार्टमेंटने सर्वेक्षण व नियोजनाचे काम हाती घेतले. पुढे या कामास १९५३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली व १९ जानेवारी १९५४ ला कामाचा प्रारंभ झाला, तर संपूर्ण काम १९६५ मध्ये पूर्ण करण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com