कृषी औषध विक्रेत्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी - कृषी संजीवकांच्या विक्रीवरील निर्बंध आणि लेबल क्‍लेमची औषध खरेदीसाठीची सक्‍ती याविरोधात  रत्नागिरीतील कृषी औषधे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. हा बंद ४ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रत्नागिरी ॲग्रो पेस्ट्रीसाईड डीलर्स्‌ असोसिएशनकडून सांगण्यात आले.

विविध मागण्यांचे निवेदन संघटनेतर्फे जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी एस. एस. जगताप यांना देण्यात आले. जिल्ह्यातील विक्रेत्यांच्या अडचणींवर श्री. जगताप यांच्याशी चर्चाही करण्यात आली. त्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

यवतमाळ येथे शेतीवर औषध फवारणी करताना २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराला केवळ कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी आहेत अशा प्रकारचा प्रचार सुरू आहे. याप्रकरणी विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कृषी विभगामार्फत पोलिस कारवाई, विक्री परवाना रद्द करणे, विक्री बंद आदेश देणे अशा गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे. या परिस्थितीत कृषी विक्रेत्यांना व्यवसाय सुरू ठेवणे अशक्‍य आहे. ऐन आंबा, काजू हंगामाच्या तोंडावर शासनाने हा निर्णय घेतल्यामुळे विक्रेते अडचणीत आले आहेत. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात सुमारे ७२ हून अधिक विक्रेते आहेत. आंबा, काजू हंगाम सुरू होत असल्यामुळे सलग तीन दिवस दुकाने बंद ठेवल्यास बागायतदारांसह शेतकऱ्यांना औषधांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.