"लाचलुचपत'च्या जाळ्यात महिला तलाठी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - खरेदी खताची नोंद सात-बारावर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागणारी महिला तलाठी जाळ्यात अडकली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी साडेसहाला पावस रोडला सापळा रचून कारवाई केली. मोटारीत रक्कम घेताना तिला पकडण्यात आले. 

रत्नागिरी - खरेदी खताची नोंद सात-बारावर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागणारी महिला तलाठी जाळ्यात अडकली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी साडेसहाला पावस रोडला सापळा रचून कारवाई केली. मोटारीत रक्कम घेताना तिला पकडण्यात आले. 

मीनाक्षी लक्ष्मीकांत कदम (रा. रत्नागिरी) असे तिचे नाव आहे. कसोपचा अतिरिक्त कार्यभार तिच्याकडे आहे. तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात-बारावर करावयाची होती. त्यासाठी काही दिवस ते खेटे मारत होते. मात्र, तलाठी मीनाक्षी कदम हिने या कामात चालढकल केली. नोंदीसाठी तक्रारदाराकडून 20 हजारांची लाच मागितली. संतापलेल्या तक्रारदाराने महिला तलाठीला अद्दल घडविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

या विभागाने तक्रारीबाबतची शहानिशा करीत साक्षीदार तपासले. खात्री पटल्यानंतर आज सायंकाळी सापळा लावण्यात आला. लाच मागितलेली रक्कम संबंधित तलाठी कार्यालयादरम्यान न स्वीकारता तक्रारदाराला पावस मार्गावर बोलावले, याची पूर्वकल्पना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला होती. विभागाचे उपअधीक्षक सतीश गुरव, पोलिस निरीक्षक तळेकर आणि अन्य सहकाऱ्यांनी पावस रोडवर सापळा रचला. मोटारीतून आलेली तलाठी मीनाक्षी कदम हिला पावस मार्गावर थांबून तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पकडले. संपूर्ण जाबजबाब घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक श्री. गुरव यांनी दिली. 

टॅग्स