दसूर व परुळेत विहिरीत पडलेल्या बिबट्यांना जीवदान

राजेश शेळके, राजेंद्र बाईत
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

राजापूर तालुक्‍यात दसूर आणि परुळे या वेगवेगळ्या दोन ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्यांना वन विभाग, स्थानिकांनी जीवदान देत सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले. विशेष म्हणजे दोन्ही बिबटे नर जातीचे आहेत. वय साधारण 5 वर्षे आहे. हद्दीतील संघर्ष आणि भक्ष्यासाठी ते मानवी वस्तीकडे वळत असल्याचे वन विभागाचे मत आहे.

राजापूर/रत्नागिरी -  बिबट्यांच्या दुप्पट वाढलेल्या संख्येने त्यांचा अधिवास धोक्‍यात आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राजापूर तालुक्‍यात दसूर आणि परुळे या वेगवेगळ्या दोन ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्यांना वन विभाग, स्थानिकांनी जीवदान देत सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले. विशेष म्हणजे दोन्ही बिबटे नर जातीचे आहेत. वय साधारण 5 वर्षे आहे. हद्दीतील संघर्ष आणि भक्ष्यासाठी ते मानवी वस्तीकडे वळत असल्याचे वन विभागाचे मत आहे.

तालुक्‍यातील दसूर येथे कमलाकर अर्जुन सुर्वे यांच्या घराच्या परिसरातील विहिरीमध्ये काल रात्री (ता. 20) बिबट्या पडला. वन विभागाने ग्रामस्थांच्या साथीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्याच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. दसूर येथील श्री. सुर्वे यांच्या घरातील सदस्य झोपल्यानंतर रात्री उशिरा परिसरातून मोठ्याने काहीतरी पडल्याचा आवाज येत होता. काहींनी धाडस दाखवत परिसराची पाहणी केली. विहिरीतून आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीमध्ये डोकावून पाहिले तर बिबट्या जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. गावात हे कळल्यावर अनेकांनी बिबट्याला पाहण्यासाठी धाव घेतली.

राकेश सुर्वे यांनी रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल बी. आर. पाटील यांना याबाबत माहिती दिली. श्री. पाटील यांनी राजापूरच्या वनपाल राजश्री कीर यांना कळवल्यावर वनपाल श्रीमती कीर, वनरक्षक एस. एम. रणधीर, व्ही. जे. कुंभार, पी. एन. डोईफोडे, एन. एस. गावडे यांच्यासमवेत रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सहकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या साह्याने बिबट्याला बाहेर काढले. वन विभागाचे हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सर्व कर्मचारी परतीच्या वाटेवर होते.

या दरम्यान त्यांना पुन्हा परुळे-वारसाचा माळ (ता. राजापूर) येथीलचंद्रकांत हरी खापणे यांच्या विहिरीत आणखी एक बिबट्या पडल्याची माहिती मिळाली. पोलिस पाटील सुनील कसपले यांनी दुपारी सव्वाबारा वाजता बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती दिली. रत्नागिरी-पाली वनक्षेत्रपाल बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पिंपळेश्‍वर विहिरीत पिंजरा सोडून आज दुपारी दीड वाजता बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले.

दोन्ही बिबटे नर 

दसूर येथील श्री. सुर्वे यांच्या विहिरीत पडलेला बिबट्या नर असून सुमारे पाच वर्षांचा आहे. त्याची लांबी 205 सेमी, तर उंची 70 सेमी आहे. परुळे येथील बिबट्यादेखील याच  वयाचा आणि उंचीचा आणि नर आहे. 

Web Title: ratnagiri news leopard in Dasur and Prule