बिबट्याच्या मुक्त संचाराने पावस पंचक्रोशीत दहशत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पावस - गणेशगुळे गावात एका दुचाकीस्वारावर दिवसाढवळ्या एका बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यातून दुचाकीस्वार बचावला असला तरी या घटनेमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गणेशगुळे, कुर्धे येथील चालत जाणारी मुले शाळेत जायला तयार नाहीत. यामुळे वनखात्याने तत्काळ बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

गणेशगुळे येथील संजय आंबरेकर हा तरुण गुरुवारी (ता. २१) सायंकाळी ६ वाजता गणेशगुळे घाटीतून पावसकडे येत होता. त्या वेळी बिबट्याने त्याचा पाठलाग केला. बिबट्याने दुचाकीवर पंजाही मारला. आवाज झाल्याने दुचाकीस्वाराने मागे पाहिले तो बिबट्या. भीतीने त्याने दुचाकीचा वेग वाढवून गणेशगुळे सडा गाठला. सड्यावरील तळ्याजवळ गावातील आणखी दोघेजण भेटले. त्यांना संजयने सारा प्रकार सांगितला. त्यामुळे तेसुद्धा थोडा वेळा थांबले होते. काल सकाळी मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्याने गणपती मंदिराजवळ बिबट्याला पाहिले होते. बिबट्या दिवसाढवळ्या दिसू लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी गावातील श्री. शिंदे याचा पाडा बिबट्याने मारला. तसेच पावसच्या कुंभार घाटीत रात्री ८ वाजता अनेकांना रस्त्यात दिसला. आज सकाळी ६ वाजता गणेशगुळे घाटीवरील तलावाजवळ एसटीतून अनेकांनी पाहिले. त्यामुळे बिबट्याच्या दिवसाढवळ्या दर्शनाने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड महिन्यापूर्वी सकाळी ६ वाजता एका महिलेवर हल्ला झाला. सुदैवाने ती बचावली. तसेच अनेक गुरे हल्ला करून बिबट्याने फस्त केली आहेत.

गणेशगुळ्यात बिबट्या दुचाकीचा पाठलाग करत असल्याने अनेकांची त्रेधातिरपिट उडाली असून एसटीने प्रवास करण्याचा विचार अनेकजण करत आहेत. कुर्धे येथे विहिरीत पडलेला बिबट्या शिडीवरून पसार झाल्याने आता त्याला पकडायचे कसा? असा प्रश्‍न वन विभागाला पडला आहे. पिंजरा एकीकडे तर बिबट्या दुसरीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्‍न असल्याने पावस विद्यामंदिरने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Web Title: ratnagiri news leopard in Pawas area