पुर्येतील जंगलात बिबट्याची डुकरांशी झटापट 

सिद्धेश परशेट्ये
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

देवरूख -  संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा पंचक्रोशीत बिबट्यांने धुमाकूळ घातला असून या बिबट्याची 
शनिवारी रात्री डुकरांच्या कळपाशी झटापट झाली. एका डुकराला बिबट्याने ठार मारून खैराच्या झाडावर नेऊन ठेवले आहे. या खैराच्या झाडापासून जवळच मोठ्या मातीच्या भुयाराजवळ डुक्कर आणि बिबट्याची झटापट झाली असावी, अशी शक्‍यता आहे

देवरूख -  संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा पंचक्रोशीत बिबट्यांने धुमाकूळ घातला असून या बिबट्याची 
शनिवारी रात्री डुकरांच्या कळपाशी झटापट झाली. एका डुकराला बिबट्याने ठार मारून खैराच्या झाडावर नेऊन ठेवले आहे. या खैराच्या झाडापासून जवळच मोठ्या मातीच्या भुयाराजवळ डुक्कर आणि बिबट्याची झटापट झाली असावी, अशी शक्‍यता आहे. याच बिबट्याने कोंडगावमधील चार कुत्रेही फस्त केल्याने पंचक्रोशीत बिबट्याची दहशत आहे. 

गेले पंधरा दिवस बिबट्याने साखरपा, कोंडगाव, पुर्ये, भडकंबा, मेढे या ठिकाणी मोकाट कुत्री, मांजरे यांच्यासह अन्य वनप्राण्यांची शिकार केल्याने पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे. शनिवारी (ता. 18) मध्यरात्रीच्या सुमारास पुर्ये येथील जंगलभागात डुकरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एकाला ठार केले. या डुक्कराला बिबट्याने खैराच्या झाडावर नेऊन ठेवले आहे. खैराच्या झाडापासून जवळच असलेल्या भुयाराजवळ त्यांची झटापट झाली असावी, असे येथे असलेल्या खुणांवरून दिसते.

भुयारानजीक दोघांच्या झटापटीत डुकराचे काही अवशेष घटनास्थळी दिसून आले. झटापट झाल्यानंतर कदाचित डुक्करांच्या कळपाचा बिबट्याला सामना करावा लागल्याने त्याने मृतावस्थेतील डुक्कराला खैराच्या झाडावर नेऊन ठेवले असावे. त्या झाडावर चढतानाही बिबट्याला मोठी कसरत करावी लागली. कारण खैराच्या झाडावर तशा खुणा आढळून आल्या. या ठिकाणी गुरे राखण्यासाठी जाणारे ग्रामस्थ भयभीत झाले असून काही गुराखी फटाके, तर काहीजण मोठे पत्र्यांचे डबे वाजवतच गुरे राखण्यासाठी जात असल्याची माहिती पुर्ये येथील ग्रामस्थ अरविंद भुवड यांनी दिली. 

याच बिबट्याला मेढेनजीक रात्रीच्या सुमारास कोंडगाव वाणीवाडी येथील विनोद गांधी यांनी रस्त्यावर बघितले. काही दिवसांपूर्वी कोंडगाव येथील केतकरवाडी येथे राहणाऱ्या किरण सप्रे यांच्या घराच्या अंगणातील कुत्र्यावर प्राणघातक हल्ला करून कुत्र्यांची शिकार केली. किरण सप्रे यांच्या अंगणात या बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत. कोंडगाव-वाणीवाडी येथील जयप्रकाश गांधी यांच्या घराच्या अंगणातील चार कुत्रे आतापर्यंत या बिबट्याने फस्त केले आहेत. 

कोंडगाव व पुर्ये या दोन गावाच्या मध्यभागातून मोठे नदीपात्र आहे. नदीपात्रात रात्रीच्या सुमारास अनेक प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे रात्री जंगलभागात बिबट्या दबा धरून बसत असण्याची शक्‍यता ग्रामस्थांनी बोलून दाखवली. अनेक ग्रामस्थांना रात्रीच्या सुमारास नेहमीच्या पायवाटेने किंवा हमरस्त्यावर बिबट्यांचे दर्शन होते. 

Web Title: ratnagiri news leopard seen in Purye Forest