शिवारआंबेरेत विहिरीतील बिबट्याची हुलकावणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पावस -  पावस पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. त्यात आज भर पडली. आज सकाळी रत्नागिरी तालुक्‍यातील शिवारआंबेरेतील विजय लाखण यांच्या विहिरीत बिबट्या पडला. त्याला बाहेर काढण्याचे वन विभागाने प्रयत्न अपयशी ठरले.

पावस -  पावस पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. त्यात आज भर पडली. आज सकाळी रत्नागिरी तालुक्‍यातील शिवारआंबेरेतील विजय लाखण यांच्या विहिरीत बिबट्या पडला. त्याला बाहेर काढण्याचे वन विभागाने प्रयत्न अपयशी ठरले.

सायंकाळी सहा वाजता कुत्र्याला पिंजऱ्यात ठेवून विहिरीत सोडण्यात आले; मात्र त्याकडे बिबट्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे वनअधिकारी हतबल झाले. काळोख पडल्यामुळे पिंजरा विहिरीत सोडून एक कर्मचारी तिथे ठेवण्यात आला असून काम थांबविण्यात आले आहे. यापूर्वी कुर्धे येथील एका पडक्‍या विहिरीत बिबट्या पडला होता; परंतु त्याला वर काढण्यास वन विभागाला यश आले नाही. अखेर वन विभागाने लावलेल्या शिडीचा उपयोग करून तो पसार झाल्यानंतर परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत होते. आज शिवारआंबेरे येथील विजय लाखण हे विहिरीचा पंप चालू करण्यासाठी गेले असता पंप थोड्या वेळाने बंद पडला. म्हणून विहिरीच्या दिशेने गेले असता ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा बिबट्या विहिरीत पडल्याचे आढळले. त्यांनी पोलिसपाटील लक्ष्मण रोकडे यांना सांगितल्यानंतर त्यांनी वन विभागाला कळवले. 

वन विभागाचे श्री. गुरव, श्री. गावडे तातडीने पिंजरा घेऊन दाखल झाले. त्यांनी कामाला सुरवात केली; परंतु विहिरीत पाणी व विहिरीतील मोकळी जागा यामुळे तो वारंवार जागा बदलत होता. काहीवेळा विहिरीचे पाणी आटवण्याचा प्रयत्न करून बिबट्याला पिंजऱ्यात आणण्याचे प्रयत्न झाले. 
बिबट्याला उसकवण्यासाठी लांज्यातील वनरक्षक राहुल गुंठे यांना दुसऱ्या पिंजऱ्यातून विहिरीत सोडण्यात आले. त्यांनी बिबट्याला उसकवून पिंजऱ्यात दवडण्यासाठी प्रयत्न केले; मात्र तो त्यांच्याच अंगावर आला. परंतु गुंठे पिंजऱ्यात असल्याने बचावले. त्यानंतर आगीचे बोळे सोडून धूर करून बिबट्याला पिंजऱ्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. तेही फोल ठरले. पिंजऱ्यात कुत्रा ठेवण्याचाही उपयोग झाला नाही. 

सकाळपासूनचे प्रयत्न फसले आणि काळोख झाल्याने पिंजरा विहिरीत सोडून ठेवण्यात आला. सर्वांना तेथून दूर जाण्यास सांगण्यात आले आहे. घटनास्थळी वनक्षेत्रपाल बी. आर. पाटील, वनपाल श्री. गुरव, जाकादेवीचे वनरक्षक श्री. डोईफोडे, राजापूरचे वनरक्षक संजय रणभीर, लांजा वनरक्षक राहुल गुंठे आदी उपस्थित होते.

गर्दीचा त्रास 
दरम्यान, बिबट्या विहिरीत पडल्याने त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिलांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बिबट्याला बाहेर काढण्याच्या कामात अडथळे येत होते. मोठ्याने होणाऱ्या चर्चेने बिबट्या बिथरत होता. त्यामुळे वनअधिकारीही वैतागले. ग्रामस्थांना बाजूला करण्याचे प्रयत्नही तोकडे पडत होते. त्यामुळे काहीवेळा वादही झाले. अखेर सायंकाळी अधिकाऱ्यांनी सर्वांनाच विहिरीपासून दूर जाण्यास सांगितले. बिबट्या पिंजऱ्यात आलाच नाही.