‘तटरक्षक’चे उड्डाण मार्चमध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

मुंबई-गोवा किनाऱ्याच्या मध्यावर रत्नागिरीत तटरक्षक दलाचा हवाई तळ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०१८ पर्यंत रत्नागिरीतील विमानतळावर तटरक्षक दलाची विमाने उतरू शकतील; मात्र खासगी वाहतूक सुरू करण्यासाठी राज्य शासनाबरोबर चर्चा सुरू आहे. त्यासाठी पायाभूत सुविधाही लागतात. त्याला थोडा कालावधी लागेल, अशी माहिती तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक के. बी. एल. भटनागर यांनी दिली.

रत्नागिरी - मुंबई-गोवा किनाऱ्याच्या मध्यावर रत्नागिरीत तटरक्षक दलाचा हवाई तळ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०१८ पर्यंत रत्नागिरीतील विमानतळावर तटरक्षक दलाची विमाने उतरू शकतील; मात्र खासगी वाहतूक सुरू करण्यासाठी राज्य शासनाबरोबर चर्चा सुरू आहे. त्यासाठी पायाभूत सुविधाही लागतात. त्याला थोडा कालावधी लागेल, अशी माहिती तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक के. बी. एल. भटनागर यांनी दिली.

तटरक्षक दलातर्फे रत्नागिरीतील ११७ मच्छीमारांना लाईफ जॅकेटचे वाटप करण्यात आले. मच्छीमार संघाच्या पेठकिल्ला येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कमांडर मुकुल गर्ग, कमांडंट एस. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, मत्स्य विभागाचे अधिकारी व मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. पेठकिल्ला, मिरकरवाडा सोसायटीलाच जॅकेट दिल्यामुळे काही मच्छीमार नाराज होते; मात्र सर्वांनाच लाईफ जॅकेट देता येणार नाहीत. उपलब्ध होतील तशी जॅकेट देण्यात येणार असल्याचे भटनागर यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, मच्छीमार हे सागराचे मालक आहेत. किनारे सुरक्षितेत मच्छीमारांचा वाटा मोलाचा आहे. त्यांच्याकडून अनेक चांगल्या-वाईट गोष्टी आम्हाला समजतात; मात्र मच्छीमार स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेत नाहीत. पूरक साहित्य वापरत नाहीत. गेल्या काही वर्षात यात बदल झाला असून आधुनिक साहित्यांची निर्मिती झाली आहे. त्याचा वापर मच्छीमारांनी करून व्यवसाय वृद्धी करावी.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, तटरक्षक दलाचा हवाई तळ रत्नागिरी उभारला जात आहे. त्यासाठी येथील विमानतळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तटरक्षक दलाची मोठी विमाने उतरण्यासाठी धावपट्टी तयार केली जात आहे. त्याचे काम फेब्रुवारी, मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर तटरक्षक दलाची विमान उतरतील. परंतु खासगी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही वाहतूक सुरू करताना पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. त्यासाठी राज्य शासनाबरोबर चर्चा सुरू आहे. ती कधी सुरू होईल हे सांगणे आताच शक्‍य नाही. कोकणातील किनारे सुरक्षित आहेत. विमाने, बोटींद्वारे देखरेख सुरू असून एकही कमकुवत दुवा आम्ही ठेवलेला नाही.

मच्छीमारांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न
मच्छीमारांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील. मच्छीमार १० वावाच्या बाहेर जाऊन मासेमारी करायला तयार नाहीत. जपानचे लोक अंटार्टिकापर्यंत जाऊन मासेमारी करतात. त्यादृष्टीने जिल्ह्यातील मच्छीमारांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न आहे. त्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी प्रशासन तयार आहे. यासाठी मच्छीमारांची कार्यशाळा होईल, असे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सांगितले.