लांज्याला डावलल्याची सोशल मीडियावरही सल

लांज्याला डावलल्याची सोशल मीडियावरही सल

लांजा - विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्‌सॲप या सोशल मीडियावर ‘लढाई स्थानिक नेतृत्वाची’ या नावाने पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये आगामी विधानसभेसाठी शिवसेनेच्या तीन आजी-माजी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह युवा नेते अजित यशवंतराव, भाजपचे प्रसाद पाटोळे व स्वाभिमानकडून राजन देसाई यांच्या नावांची चर्चा होत आहे. या पोस्टने तालुक्‍यातील राजकीय वर्तुळात चर्चेला चालना मिळाली आहे.

लांजा-राजापूर मतदारसंघ झाल्यापासून लांजा तालुक्‍यात शिवसेनेत डावलल्याची भावना निर्माण झाली आहे. ही सल अधूनमधून बाहेर पडते. त्याचप्रमाणे यावेळी त्याला सोशल मीडियावरून वाट फुटली की, शिवसेनांतर्गत चर्चा घडवून आणून गोंधळ माजवून देण्याचा प्रयत्न आहे, याबाबत स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे या पोस्टचा धनी कोण, याचा शोध सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तालुका शिवसेनेंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

त्यातूनच महिनाभरापूर्वी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप दळवी यांना पदावरून हटवावे यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. त्यातून शिवसेनेतील अंतर्गत सुप्त संघर्ष उफाळून आला होता. मात्र, वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे संदीप दळवी यांना अभय मिळाल्याने त्यानंतर हे प्रकरण थंडावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या अंतर्गत विरोधी गटाने खासदार विनायक राऊत यांची भेट घेत नाराजी प्रगट केली होती. 

हे प्रकरण थांबते न थांबते तोच गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्‌सॲपवर फिरणाऱ्या पोस्टमुळे तालुका शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे.  ‘लढाई स्थानिक नेतृत्वाची’ अशा नावाने स्थानिक नेतृत्वाबाबत मल्लिनाथी करण्यात आली आहे. स्थानिक नेतृत्व नसल्याने तालुक्‍याचा विकास खुंटला आहे. शैक्षणिक, आरोग्य, नोकरी व एमआयडीही याबाबतीत तालुका मागासलेला राहिला असून स्थानिक नेतृत्वाअभावी तो पोरका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

स्थानिक नेतृत्व असे
आजपर्यंत लांजा तालुक्‍यात स्थानिक नेतृत्वाचे पाय ओढण्याचे काम केले गेले. म्हणूनच तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जगदीश राजापकर, माजी जि.प. बांधकाम सभापती दत्ता कदम, विद्यमान जि.प.सदस्य चंद्रकांत मणचेकर, युवा नेते अजित यशवंतराव, भाजपाचे प्रसाद पाटोळे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते राजन देसाई यांच्या नावांना पसंती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com