कोकण रेल्वेच्या आरक्षित डब्यांना जनरलचे स्वरूप

राजेश कळंबटे
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - बेमुदत संपामुळे एसटीचा प्रवासी कोकण रेल्वेकडे वळला. त्यामुळे गेले दोन दिवस कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. ऐन दिवाळीतील या संपाने कोकण रेल्वे प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे आरक्षित डब्यांनाही जनरलचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यातून प्रवाशांमध्ये वादावादीला तोंड फुटत आहे.

रत्नागिरी - बेमुदत संपामुळे एसटीचा प्रवासी कोकण रेल्वेकडे वळला. त्यामुळे गेले दोन दिवस कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. ऐन दिवाळीतील या संपाने कोकण रेल्वे प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे आरक्षित डब्यांनाही जनरलचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यातून प्रवाशांमध्ये वादावादीला तोंड फुटत आहे.

ऐन दिवाळीतील एसटी संपाने चाकरमान्यांचे कोकणात येण्याचे वेळापत्रक कोलमडले. एसटीच्या प्रवाशांनी कोकण रेल्वेचा आधार घेतला. मुंबईतून येणाऱ्या सर्वच गाड्या भरुन येत आहेत. दिवाळीची सुट्‌टी पडल्यामुळे अनेकजणं रेल्वेतून कोकणात दाखल होत आहेत. जनरल डबे खच्चून भरलेले आहेत. गाडीच्या दरवाज्यांपासून मोकळे पॅसेजे ते शौचालयांच्या शेजारी बसूनही प्रवाशांनी प्रवास केला. आरक्षित डब्यांमध्येही अनेकांनी उभे राहून प्रवास करणे पसंत केले. मुंबईतून काल रात्री सुटलेल्या कोकणकन्या, तुतारी एक्‍स्प्रेसला नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती.

कोकणकन्याची प्रतीक्षा यादी सातशे ते आठशेपर्यंत होती. पंधरा दिवसांपूर्वी अपेक्षेने प्रवाशांनी आरक्षण केले; मात्र त्यांची निराशा झाली. आरक्षित सर्वच डब्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्यामुळे टीसीनीही आरक्षित डब्यातील प्रवाशांची तिकिटे तपासण्यासाठी जाण्याचे धाडस दाखवले नाही.

दिवाळी, गणपतीसह सुट्‌टीच्या कालावधीत कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या फुल्ल असतात. त्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन केले जाते; परंतु ऐन दिवाळीत सुरु असलेल्या संपाचा परिणाम लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाकडून आयत्यावेळी जादा गाडी सोडणे आवश्‍यक होते, पण तसे झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना हालअपेष्टा सहन करत मुंबईहून कोकणात यावे लागत आहे. कोरेकडून दिवाळीसाठी जादा गाड्या सोडल्या असल्या तरीही त्या अपुऱ्या आहेत. कोकणाचे सूपुत्र सुरेश प्रभूंची गच्छंती झाल्यानंतर कोकण रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षांचा भंग होत असल्याचे दिसून येत आहे. भाऊबीजेसाठी येणाऱ्या भावांमुळे उद्या गर्दीत भर पडण्याची शक्‍यता आहे.

परदेशी पाहुण्यांची माणूसकी
आरक्षित डब्यात गर्दी असल्यामुळे बसायला सोडाच पण उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. या परिस्थितीत तीन परदेशी महिला पाहुण्यांनी मुंबईतून प्रवास करणाऱ्या काही महिला प्रवाशांना आपल्या सीटवर बसण्यासाठी जागा करुन दिली. त्या गर्दीतही त्यांनी दाखवलेल्या माणुसकीने कोकणी माणसेही भारावली. मराठी माणूस मदतीसाठी नाही धावला, पण परदेशी पाहूण्यांनी मदत केली अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

‘कोकणकन्या’ झाली पॅसेंजर
कोकणकन्या एक्‍स्प्रेस काल (ता. १८) रात्री मुंबईतून अर्धा तास उशिराने सुटली. खेडच्या मागे एका स्थानकावर तब्बल दीड तास गाडी थांबून होती. संपूर्ण प्रवासात तीन ते चार वेळा या गाडीला थांबा देण्यात आला होता. दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुढे काढण्यासाठी एका स्थानकावर एक्‍स्प्रेस तासभर थांबवून ठेवण्यात आली. जलद गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणकन्येची आज पॅसंजर झाल्याचा अनुभव प्रवाशांनी व्यक्‍त केला. तसेच कोकण रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजीही व्यक्‍त केली. ही गाडी तीन तास उशिराने धावत होती.