रोज किमान एका गणिताचे मार्गदर्शन ऑडिओ क्‍लिपद्वारे 

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

अकरावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती जावी आणि त्यांना आवश्‍यक त्या प्रत्येक गणिताचे मार्गदर्शन मिळावे यासाठी डॉ. राजीव सप्रे यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. दररोज किमान एक गणित कसे सोडवावे याची ऑडिओ क्‍लिप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते.

रत्नागिरी - इंग्रजी आणि गणिताची विद्यार्थ्यांची भीती हा शिक्षण क्षेत्रात मोठा प्रश्‍न आहे. गणित हा विषय म्हटला की विद्यार्थी व पालकांच्या पोटात गोळा येतो. मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती जावी आणि त्यांना आवश्‍यक त्या प्रत्येक गणिताचे मार्गदर्शन मिळावे यासाठी डॉ. राजीव सप्रे यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. दररोज किमान एक गणित कसे सोडवावे याची ऑडिओ क्‍लिप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते. या क्‍लिप डॉक्‍टर स्वतः बनवतात. हे मार्गदर्शन विनामूल्य आहे, हे त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य. 

शालेय जीवनापासून अनेकांना गणित कठीण, किचकट वाटते. या विषयात दहावी, बारावीला दांडी उडते. मात्र हा विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपा कसा बनू शकेल, यावर विचार करून डॉ. सप्रे यांनी प्रयोग सुरू केला.  ते गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागप्रमुख आहेत. दररोज एक गणित कसे सोडवावे याचे ते रेकॉर्डिंग करून व्हॉट्‌सऍपद्वारे थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात.  एक जानेवारीपासून या उपक्रमात ब्रॉड कास्टिंग लिस्टद्वारे 150 हून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. 

ही विद्यार्थीसेवा आहे. गणित अगदी सोप्या भाषेत मुलांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे. विद्यार्थ्याने नाव व मोबाईल नंबर कळवल्यास त्यालासुद्धा क्‍लिप पाठवण्यात येईल.
- डॉ. राजीव सप्रे 

गणित विषयात आजवर त्यांनी राबवलेल्या उपक्रमात ही भर पडली आहे. गणित सोपे करण्याकरिता पायऱ्यांची रचना कशी करावी, किचकट प्रश्‍नावर विविध पर्यायांनी उत्तर कसे शोधावे याबाबत त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. अमेरिका 2, पुणे 3, रत्नागिरीतील कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. पटवर्धन हायस्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालयातील 43 विद्यार्थ्यांनी व्हॉट्‌सऍप ग्रुप केला असून त्यात डॉ. सप्रे ऑडिओ क्‍लिप पाठवतात. विद्यार्थी त्यावर खूष आहेत. 

केरळमध्येही ऑडिओ 

केरळमधील श्‍वेता वालसन ही गोगटे कॉलेजची माजी विद्यार्थिनी. ती केरळमध्ये शिकवते. ती एकदा रत्नागिरीत आली असता डॉ. सप्रे यांनी तिला ऑडिओ क्‍लिपचा उपक्रम सांगितला. त्यानंतर केरळमधील 24 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. अकरावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. 

 

Web Title: Ratnagiri News Mathematics teaching by audio clip Dr Rajiv Spare