उत्पन्नाची अट शिथिल केल्याने "भाग्यश्री' सुखावली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

रत्नागिरी - दारिद्यरेषेखालील उत्पन्नाची अट शिथिल केल्यामुळे "माझी कन्या भाग्यश्री' योजनेला रत्नागिरी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक किंवा दोन मुली जन्मलेल्या 61 पालकांना यातून 30 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. मुलींचा जन्मदर वाढविणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे यासारखे उद्देश यामुळे सफल होणार आहेत. 

रत्नागिरी - दारिद्यरेषेखालील उत्पन्नाची अट शिथिल केल्यामुळे "माझी कन्या भाग्यश्री' योजनेला रत्नागिरी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक किंवा दोन मुली जन्मलेल्या 61 पालकांना यातून 30 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. मुलींचा जन्मदर वाढविणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे यासारखे उद्देश यामुळे सफल होणार आहेत. 

राज्यात मुलींचे शिक्षण व आरोग्य यात सुधारणा करणे, त्यांच्या भविष्यासाठी तरतूद करणे, भ्रूण हत्या, बालविवाह रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे यासाठी सुकन्या योजना 1 जानेवारी 2014 ला दारिद्रयरेषेखाली जन्मणाऱ्या मुलींसाठी लागू केली होती. उत्पन्नाची मर्यादा कमी असल्याने अनेक लाभार्थी यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे 1 ऑगस्ट 2017 ला सुकन्या योजनेची माझी कन्या भाग्यश्री असे नामांकन करण्यात आले. निकष बदलून उत्पन्नाची मर्यादा साडेसात लाख रुपयांपर्यंत केली गेली. तसेच सुकन्या योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा 2017-18 या आर्थिक वर्षातील नवीन योजनेत समावेश करण्याचा निर्णय झाला.

"भाग्यश्री' योजनेत एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे पन्नास हजार, तर दोन मुलींनंतर नियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये ठेवण्याची तरतूूद आहे. जिल्ह्यात 17-18 या आर्थिक वर्षात 61, तर 18-19 साठी 3 प्रस्ताव आले आहेत. मागील आर्थिक वर्षातील प्रस्तावांना लाभ देण्यासाठी संबंधितांची बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत खाती उघडण्याचे काम सुरू आहे. लाभार्थींसाठी निधी आला असून त्याचे वितरणही तत्काळ केले जाईल. 

"दारिद्रयरेषेखालील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना भाग्यश्री योजनेतून साह्य मिळावे, यासाठी महिला व बालकल्याण विभाग प्रयत्नशील आहे. प्रस्ताव आल्यानंतर त्याची तत्काळ छाननी करून निर्णय घेतला जातो.'' 
- महादेव आरगे,
महिला व बालविकास अधिकारी 

तालुका लाभार्थी संख्या 
* मंडणगड 2 
* दापोली 2 
* दाभोळ 6 
* खेड 2 
* गुहागर 10 
* चिपळूण 13 
* संगमेश्‍वर 2 
* रत्नागिरी 16 
* लांजा 4 
* राजापूर 4 
 

Web Title: Ratnagiri News Mazhi Kanya Bhagashri special