किनाऱ्यावर ठिपकेदार ‘झोळीवाला’चे दर्शन

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - धोक्‍याच्या सीमारेषेवरील ठिपकेदार चोचीचा ‘झोळीवाला’ या पक्ष्याचे कोकण किनारपट्टीवर प्रथमच दर्शन घडले. त्याची तशी नोंद करण्यात आली आहे. तालुक्‍यातील गावखडी-पूर्णगडच्या किनाऱ्यावर ‘झोळीवाला’ पक्षी ‘निसर्गयात्री’चे सदस्य व सर्पमित्र प्रदीप डिंगणकर यांना आढळला. तसेच तुतवार व समुद्री बगळा या स्थलांतरित पक्ष्यांचीही उपस्थिती या किनाऱ्यावर पाहायला मिळाली.

रत्नागिरी - धोक्‍याच्या सीमारेषेवरील ठिपकेदार चोचीचा ‘झोळीवाला’ या पक्ष्याचे कोकण किनारपट्टीवर प्रथमच दर्शन घडले. त्याची तशी नोंद करण्यात आली आहे. तालुक्‍यातील गावखडी-पूर्णगडच्या किनाऱ्यावर ‘झोळीवाला’ पक्षी ‘निसर्गयात्री’चे सदस्य व सर्पमित्र प्रदीप डिंगणकर यांना आढळला. तसेच तुतवार व समुद्री बगळा या स्थलांतरित पक्ष्यांचीही उपस्थिती या किनाऱ्यावर पाहायला मिळाली.

श्री. डिंगणकर यांना हे पक्षी आढळल्यावर त्यांनी लगेच आपल्या सदस्यांशी संपर्क साधत याची कल्पना दिली. निसर्गयात्रीमधील पक्षिमित्रांनी याची ओळख करून आश्‍चर्य व्यक्त केले. धोक्‍याच्या सीमारेषेवर असलेल्या या पक्ष्याच्या उपस्थितीने पक्षिमित्रांसमोर अनेक प्रश्‍न उभे केले आहेत.

निसर्गयात्रीचे सदस्य गेली काही वर्षे कोकणातील विशेषतः रत्नागिरी, राजापूर तालुक्‍यात निसर्गातील वेगवेगळ्या घटकांवर काम करीत आहेत. या परिसरात सुमारे ३०० पेक्षा अधिक जाती-प्रजातीतील पक्ष्यांच्या नोंदी त्यांनी घेतल्या आहेत. त्यात दुर्मिळ तसेच नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पक्ष्यांमधील प्रजातींचीही नोंद त्यांनी घेतली आहे.

या संदर्भात पक्षिमित्र सुधीर तथा भाई रिसबूड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झोळीवालाची माहिती सांगितली. पेलिकॅनिडी या कुळातील या पक्षाला पिवश्‍या टोक, पांढऱ्या भुज्या जलसिंह, श्‍वेत महाप्लव या नावांनी सुद्धा ओळखले जाते. करड्या-भुऱ्या पांढरा रंगाचा हा पक्षी आकाराने साधारण गिधाडापेक्षा मोठा म्हणजे सुमारे १५२ सेंमीचा आहे. मोठी चपटी चोच व चोचीखाली अंजिरी रंगाची पिशवी ही त्याची पटकन ओळखण्याची खूण आहे.

हा पक्षी समूहाने राहतो व पाणथळ जागेच्या आजूबाजूच्या झाडांवर वस्ती करतो. घरटे बांधतो. मोठी तळी, सरोवरे, नद्या व समुद्रकिनाऱ्यावर आढळणारा हा पक्षी भारताच्या पूर्व  किनारपट्टीवर आढळतो. या पक्षाचा आढळ पश्‍चिम किनारपट्टीवर मुख्यतः कोकण किनारपट्टीवर नाही. जैवविविधता, प्रागैतिहासिक स्थळांचा शोध, पर्यटन अशा विविध क्षेत्रात कार्यरत निसर्गयात्रीच्या सदस्यांनी झोळीवाला दिसल्यामुळे आश्‍चर्य व आनंद व्यक्त केला आहे.

‘निसर्गयात्री’चे उल्लेखनीय कार्य
निसर्गयात्रीने गावखडी किनाऱ्यावर व तालुक्‍यात प्रथमच ऑलिव्ह रिडले या कासवांच्या अंड्यांचे रक्षण केले व यातील बहुतांशी पिल्ले समुद्रात रवाना झाली. पक्षी संवर्धनासाठीही निसर्गयात्रीने एक पाऊल पुढे टाकले आहे. झोळीवाला, तुतवार व समुद्री बगळा हे कोकण किनाऱ्यावर कसे आढळले याबाबत संशोधन सुरू आहे.

डिंगणकर यांच्याकडून ‘झोळीवाला’ आढळल्याची माहिती मिळताच आनंद झाला. कोकणात कधीही न आढळणारा हा पक्षी येथे कसा आला, तो स्थलांतरित झाला आहे का याचा अभ्यास सुरू केला आहे. तसेच नामवंत पक्षी मित्रांशी संपर्क साधला आहे. बीएनएचएसमध्येही संपर्क साधला आहे.

- सुधीर रिसबूड, पक्षीमित्र

Web Title: ratnagiri news migrated birds on coastal line