मिऱ्या-कोल्हापूर चौपदरीकरणास व्यापाऱ्यांचा विरोध

मिऱ्या-कोल्हापूर चौपदरीकरणास व्यापाऱ्यांचा विरोध

रत्नागिरी - मिऱ्या-कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाची मोजणी लोकभावनेचा विचार करून ११ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मोजणीविरोधात कुवारबाव येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. ४५ ऐवजी ३० मीटर रस्त्यांच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबरला बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कुवारबाववासीय गाऱ्हाणे मांडणार आहेत. प्रशासनाकडूनही त्यांना अंतिम मुदत देण्यात आली आहे. पुढील तारखेला मोजणीचे कामे पोलिस संरक्षणात पूर्ण करण्याची तयारी महसूल प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेंतर्गत मोजणीचे काम गेले दोन दिवस सुरू आहे. पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांना कडाडून विरोध झाला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होता; मात्र स्थानिक व्यापाऱ्यांचा गोंधळ पाहून प्रशासनानेही मोजणी आवरती घेतली. मोजणीसाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण झाली होती. प्रत्यक्षात मोजणीचे काम आज सुरू होणार होते. सकाळी कुवारबाव येथील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोजणीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणे पसंत केले. त्यामळे पूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती.

प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी काम बंद पाडले. प्रांताधिकारी अमित शेडगे, पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्या वेळी उपस्थितांनी ३० नोव्हेंबरला बांधकाममंत्री जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांच्याकडे कुवारबावचा प्रश्‍न मांडणार आहोत. त्यात शिथिलता मिळेल, असा विश्‍वास आहे. लोकभावना लक्षात घेऊन श्री. शेडगे यांनी ही मोजणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पुढील कार्यवाही ११ डिसेंबरला केली जाणार आहे. कोणतीही नोटीस न देता शासन मोजणी करत आहे. 

हे एकप्रकारे आमच्या जागेवर अतिक्रमण केल्यासारखे आहे. दोन्ही बाजूला १५ मीटरप्रमाणे जागा सोडण्यास आम्ही तयार आहोत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भातील लेखी तक्रारी प्रशासनाकडे केल्या आहेत. त्याची उत्तरे दिली जात नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला; मात्र संयुक्‍त मोजणीच होत नाही, तोपर्यंत आलेल्या तक्रारीवर सुनावणी होणार नाही, तक्रारीतील मुद्दे मोजणीशी निगडित असल्याचे प्रांत शेडगे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडून मोजणी पुढे ढकलल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता कुवारबाव बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू झाले.

पानवल, साळवी स्टॉपचा प्रश्‍न सुटेल
पानवल, साळवी स्टॉपवासीयांकडून सुरवातीला करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले आहे. साळवी स्टॉपला एकाच बाजूची जागा घेण्यात आल्याचा आक्षेप होता. प्रत्यक्ष मोजणीत त्याचा विचार झाला असून, दोन्ही बाजूला प्रत्येकी ३० मीटर जागा संपादित केली जाईल. चौपदरीकरणासाठी पानवल येथे डोंगर कापला गेला, तर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्‍त केली होती. तेथे ९० ऐवजी ६० मीटरचा रस्ता ठेवण्यात येणार आहे. तसेच दरड कोसळून नये, यासाठी संरक्षक भिंत उभारली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र कुवारबाव येथील रस्ता ३० मीटर करण्याच्या प्रश्‍नावर तोडगा निघणे अशक्‍य असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील तारीख प्रशासनाच्या पथ्थ्यावर
नाणार (ता. राजापूर) येथे आंदोलन सुरू असल्यामुळे पोलिस दलाचा सर्वाधिक वापर तिकडे करण्यात आला आहे. त्यामुळे कुवारबावला सशस्त्र पोलिस दलाची कुमक देणे पोलिस प्रशासनालाही शक्‍य नव्हते. लोकभावनेचा उद्रेक झाला, तर त्यांना सावरणे घटनास्थळी उपस्थित पोलिस संख्येच्या कक्षेत नव्हते. त्यामुळे पुढे ढकललेली तारीख महसूल प्रशासनाच्या पथ्थ्यावर पडणार आहे.

मिऱ्या-कोल्हापूर महामार्गासाठीच्या भूसंपादनाची अंतिम अधिसूचना फेब्रुवारीपर्यंत काढावयाची आहे. त्यामुळे ही कार्यवाही येत्या काही दिवसांत पूर्ण करावी लागेल.
- अमित शेडगे,
प्रांताधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com