पाण्याचा रंग, लाटांच्या फेणीतून मॉन्सूनची वर्दी

राजेश कळंबटे
मंगळवार, 29 मे 2018

रत्नागिरी - हवामान विभागापेक्षाही पारंपरिक मच्छीमारांना पंधरा दिवस आधीच पावसाची वर्दी मिळते. समुद्राच्या बदल्या रंगावरून आणि किनार्‍यावर येणार्‍या फेसाळणार्‍या लाटांमधील ‘फेणी’ पाहिली की मच्छीमाराला मॉन्सून दाखल होणार असल्याचे लक्षात येते. मग बोटी आवरण्याची सुरवात मच्छीमार करतात. गेली अनेक वर्षे त्यांचा ठोकताळा कधीच चुकलेला नाही.

रत्नागिरी - हवामान विभागापेक्षाही पारंपरिक मच्छीमारांना पंधरा दिवस आधीच पावसाची वर्दी मिळते. समुद्राच्या बदल्या रंगावरून आणि किनार्‍यावर येणार्‍या फेसाळणार्‍या लाटांमधील ‘फेणी’ पाहिली की मच्छीमाराला मॉन्सून दाखल होणार असल्याचे लक्षात येते. मग बोटी आवरण्याची सुरवात मच्छीमार करतात. गेली अनेक वर्षे त्यांचा ठोकताळा कधीच चुकलेला नाही.

मान्सून केरळात आला. तो चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात बरसण्याची अपेक्षा स्कायमेटने व्यक्त केली आहे. मात्र पावसाचे अचूक ठोकताळे मच्छीमारही बांधतो. कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दर्याच्या राजानेही त्याचा अंदाज समुद्राच्या फेसाळणार्‍या लाटेतून मातीच्या रंगाचा फेस किनार्‍यावर पाहायला मिळाल्यामुळे बांधला आहे. या फेसाला फेणी म्हणतात. सध्या किनार्‍यावर फेणीचे पाणी पाहायला मिळत आहे. समुद्राच्या निळ्याशार रंगात बदल होतो आणि तो लालसर होत जातो. सध्या कोकण किनारपट्टीवर निसर्गातील हे बदल दिसू लागले आहेत. लाटांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे मान्सून या आठवड्यात सक्रिय होणार हे ध्यानात येऊन मच्छीमारांनी आवरते घेतले आहे. दक्षिणेकडून येणार्‍या वार्‍याचे प्रमाण वाढले असून समुद्र खवळलेला आहे.

बोटी ओढण्यास सुरवात

समुद्रात घडणारे बदल पाहिल्यानंतर मच्छीमारांनी आवराआवर करण्यास सुरवातही केलेली आहे. अनेकांनी बोटी बंदराच्यावर ओढूनही ठेवलेल्या आहेत. आता फक्त मच्छीमार वाट पाहातायेत ती पाऊस सुरू होण्याची. सध्या 95 टक्के मच्छीमारांनी व्यवसाय बंद केला आहे. 

वेगवान वार्‍यावर आणि समुद्राच्या रंगावरून मान्सून कधी येणार हे आम्ही ओळखतो. त्यानंतर पावसाची तयारी केली जाते.

- सुनील शिवलकर, मांडवी

जिल्ह्यात पावसाचे आगमन 5 जूनलाच

हवामान खात्याचे अंदाज बदलत असले, तरी निसर्ग आपले अंदाज देतो. त्यानुसार कोकणात 5 जूनला पाऊस येणार आहे. रोहिणी नक्षत्राच्या आगे-मागे उगवणार्‍या दिंडा आणि आधेलेफोक जोडीच्या आगमनाने पावसाचा वर्षानुवर्षे वर्तवलेला अंदाज खरा ठरतो आहे. मच्छीमारांची निरीक्षणे आहेत, त्यानुसार तेही पावसाचे अंदाज देतात.

याबाबत प्रा. उदय बोडस यांनी सांगितले की, पोमेंडीच्या बागेत अगदी कडेला दिंडा आणि आधेलेफोक अशी जोडी साधारणपणे रोहिणी नक्षत्राच्या आगे-मागे उगवते. सोमवारी (ता. 28) दिंडा 2 इंच आणि आधेलेफोक 3 इंचापेक्षा जरा जास्तच उंच दिसला. त्यांच्या उंचीच्या गुणाकाराइतक्या दिवसांनी पाऊस उतरतो असे गणित. यंदा गुणाकार 7 च्या पेक्षा जरा जास्त आहे. म्हणजे 28 + 7= 35. मे महिना 31 दिवसांचा म्हणजे 4 जून किंवा 5 जून ही पावसाची तारीख येते. बागेत काम करणार्‍या जाणत्या गड्यांनी त्यांना निसर्ग वाचायला असा शिकवला. जवळपास 20 वर्षे अशी अंदाज केलेली तारीख काही तासांनीच मागेपुढे झाली आहे.

यावर्षी पाऊस धो धो पडणार नाही. जोरदार मारा असणार नाही, कारण कावळ्यांनी घरटे 32 फुटावर बांधले असून घरट्यावर जेमतेम एक फाटा कव्हर म्हणून आहे. जेव्हा पाऊस जोरदार मारा करतो तेव्हा घरटे 18 फूट इतके खाली असते, तर मध्यम मार्‍याच्या पावसात ते 24 फुटावर असते, असे निरीक्षण नोंदवून बोडस म्हणाले की, 1996 पासून वृद्ध गडी पावसाचे आगमन सांगायचे. त्याचा मुख्य फायदा माडांचे पाणी तोडणे (पंपाने करायचे शिंपणे थांबवणे), खते आणून घेणे आणि पेरणीचा कालावधी लक्षात घेऊन खते घालणे, त्यासाठी माणसे बोलावणे, हे वेळापत्रक निश्‍चित करायला व्हायचा. पाऊस 10 जूनला सुरू झाला त्यावर्षी ही दिंडा-आधेलेफोक जोडी 2 जूनला उगवली होती. शिंपणे 4 जूनपर्यंत करावे लागले होते.

Web Title: Ratnagiri News Monsoon arrival special