रत्नागिरी पालिकेत नगराध्यक्षांनी उगारला खलितारूपी आसूड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - पालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला वर्ष व्हायला आले तरी शहर विकासाचा गाडा गती पकडत नाही. याचा जनतेत रोष आहे. परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने सेनेने पालिका प्रशासनाला काम करा, असे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष राहुल पंडित यांना कठोर भूमिका घ्यावी लागली.

रत्नागिरी - पालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला वर्ष व्हायला आले तरी शहर विकासाचा गाडा गती पकडत नाही. याचा जनतेत रोष आहे. परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने सेनेने पालिका प्रशासनाला काम करा, असे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष राहुल पंडित यांना कठोर भूमिका घ्यावी लागली.

सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी मिळालेली अनेक कामे अडकून आहेत. ती लवकरात लवकर मार्गी लावा, अन्यथा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे लेखी फर्मान मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. 

पालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा रोष सत्ताधाऱ्यांवर काढला जातो. विकासकामे असोत वा पाणी प्रश्‍न किंवा कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या, बदली, पगारवाढीसाठीसुद्धा आम्हालाच दोषी धरले जाते. पालिका प्रशासनाची काही जबाबदारी नाही का, असा उद्विग्न सवाल नगराध्यक्षांनी प्रशासनाच्या प्रमुखांना केला. मंगळवारी सायंकाळी याबाबत खातेप्रमुखांची बैठक झाली. त्यामध्ये नगराध्यक्षांनी सौम्य भाषेत समजावून सांगितले. गरज पडली तेथे कानपिचक्‍याही दिल्या. थेट नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक निवडून आणत शिवसेनेने एकहाती पालिकेवर सत्ता प्रस्थापित केली. शहरवासीयांना सेनेकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना उतरण्यास सेनेला अजून यश आलेले नाही. याची नेमकी मेख आता उघड झाली. पालिका प्रशासनावर अजूनही सेनेला अंकुश ठेवता आलेला नाही. 

नगराध्यांनी प्रशासनाला चांगुलपणाने गोंजारून अनेक वेळा सांगून पाहिले. त्याचा किंचितही परिणाम झाला नाही. सेनेवरील रोष वाढतच गेला. यामुळे नाईलाजास्तव नगराध्यक्षांना आता कठोर आणि कणखर भूमिका घ्यावी लागली. शहर विकासाच्या दृष्टीने सर्वसाधारण सभेत आलेल्या अनेक विषयांना मंजुरी मिळाली; मात्र प्रशासनाकडून होणारी पुढील कार्यवाही धीमेपणाने होते. ठपका मात्र सत्ताधाऱ्यांवर ठेवला जातो. आपल्यावरील हा रोष घालविण्यासाठी आणि नेमकी वस्तुस्थिती पुढे यावी, म्हणून प्रशासनाला नगराध्यक्षांनी खरमरीत पत्र दिले. 

वाद होण्याची शक्‍यता 
सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेल्या अनेक विषयांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचनाच मुख्याधिकारी श्री. माळी यांना दिल्या. यामुळे पालिकेचा कारभार गतिमान होणार की, सत्ताधारी आणि प्रशासन असा, नवा वाद निर्माण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.