राष्ट्रवादीच्या फलकबाजीत खेड तालुक्यात नव्यांचाच वरचष्मा 

 खेड ः दिवाळीपासून चमकणारे आकाश कंदिल अद्याप कायम आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीसांचा फोटो नाही. यातूनच वाद सुरू झाला. 
खेड ः दिवाळीपासून चमकणारे आकाश कंदिल अद्याप कायम आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीसांचा फोटो नाही. यातूनच वाद सुरू झाला. 

खेड -  तालुक्‍यात सेनेच्या झंझावातातही राष्ट्रवादीचा झेंडा सदैव फडकावत ठेवणाऱ्या शिलेदारांचा सध्याच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विसर पडला आहे. त्यामुळे खेड तालुक्‍यात सोशल मीडियावरून जुन्यांना डावलणाऱ्या नव्यांविरोधात आणि जुन्यांना मोडीत काढू इच्छिणाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या गोटातही मतभेद असून जुन्या नेत्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. दिवाळीपासून झळकणाऱ्या फलकांवरून ज्येष्ठ नेत्यांच्या छबी गायब आहेत. गेल्या आठवड्यात सुप्रियाताई सुळेंसह ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत्यांचा खेड दौरा झाला, तेव्हाही हेच फलक झळकत होते. यामुळे कानामागून आले आणि तिखट झाले अशी नव्यांची अवस्था झाली आहे. 

तालुक्‍यात दिवाळीपासून अनेक शुभेच्छा फलक लावण्यात आले. त्यावरील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव यांचा फोटोच गायब आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कोकणचे प्रभारी व माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्याही छब्या नाहीत. शिवसेनेचा झंझावात असताना तालुक्‍यात राष्ट्रवादीची पताका फडकत ठेवणाऱ्या बाबाजी जाधवांना बाजूला करण्यात आले काय, असा सवाल विचारला जात आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांत शहरासह तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पक्ष सदस्यत्वांचाच राजीनामा दिला. पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निसार खतीब व अनिल सद्रे यांनी तालुक्‍यात मेहनत घेतली. परंतु नव्या पक्षात येऊन पदसिद्ध झालेल्यांनी त्यांना पालिकेच्या निवडणुकीत विश्‍वासात घेतले नाही, शिवाय शहरातील पटावर आपल्या प्याद्यांना संधी दिली. तेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही झाले.

यापूर्वी निवडणुका पक्षचिन्हावर झाल्या, परंतु यावेळी राष्ट्रवादीचे चिन्हच निवडणुकीत बासनात बांधले गेले. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करण्याचा विचार सुरू केला. परिणामी गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीतून अनेक कार्यकर्ते सेनेत दाखल झाले. ज्यांनी आतापर्यंत उमेदवारी मिळवून दिली, त्यांनाच बाजूला करण्याची नीती अवलंबिली जात आहे.

स्थानिक आमदार संजय कदम व प्रदेशाध्यक्षांचे मेहुणे तसेच शहरातील पदाधिकारी व सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांचे या शुभेच्छा फलकावर फोटो आहेत. यावरून वाद रंगलेला असतानाही सुप्रियाताई, तटकरे यांसारखे ज्येष्ठ नेते खेडमध्ये आलेले असतानाही हे फलक हटवले गेले नाहीत. त्यामुळे नेत्यांचा असा विसर पडल्याचे अधोरेखित केले जात आहे की काय, अशी शंका व्यक्त करण्यात आली. 

शुभेच्छा फलक स्वतःच्या पैशाने कार्यकर्ते छापतात. केव्हा छापतात हे समजतही नाही. काही वेळा माझाही फोटो नसतो. नेत्यांचा फोटो नसतो. कधी तरी कार्यक्रमाच्या पत्रिकेत आमचे नाव खाली छापण्यात येते. काही झाले तरी हा आपलाच कार्यकर्ता आहे, असे आम्ही मानतो. कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागणे आवश्‍यक आहे. तरीही त्यांना सांभाळून घेणेही तेवढेच आवश्‍यक आहे. 
- आमदार संजय कदम 

जुन्याची पाठ 
राष्ट्रवादीतील जुने आणि नवीन असा वाद चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे तालुका राष्ट्रवादीतील वातावरण तापलेले आहे. जुने मूग गिळून आहेत. नवे मात्र जोशात चालले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व अनेक नेते मंडळी आली. तेव्हाही जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षांकडे पाठच फिरवली. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com