कुंभवडे शाळेला शिक्षक नाहीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

राजापूर -  शिक्षकासाठी कुंभवडे येथील विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभाला पंचायत समितीवर मोर्चा आणून लक्ष वेधले होते. शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्याला तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी जिल्हा परिषद शाळा नं. २ वर शिक्षक न देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

पदाधिकाऱ्यांना या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षक मागणीसाठी विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीवर मोर्चा आणण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद देसाई आणि पालकांनी दिला आहे. 

कुंभवडे येथे जिल्हा परिषदेच्या तीन शाळा असून या तिन्ही शाळांमध्ये गेल्या काही वर्षापासून शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असलेली आणि २७ पटसंख्या असलेली जिल्हा परिषद नं. २ या शाळेचा समावेश आहे. ही शाळा एक शिक्षकी असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. एखाद्या शैक्षणिक कामासाठी शिक्षक शाळेमध्ये नसल्यास त्या ठिकाणी अन्य शाळेतील शिक्षक हजर राहण्यासाठी तारेवरची कसरत होते. 

शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन शिक्षक द्यावेत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. शिक्षक मागणीसाठी येथील पालकांनी विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीवर दोन महिन्यांपूर्वी मोर्चाही काढला होता. मोर्चावेळी पदाधिकाऱ्यांनी तातडीने शिक्षक देण्याचे आश्‍वासन दिले होते. दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. त्याबाबत श्री. देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाकडून खोटी आश्‍वासने देऊन केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही दिवसांमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी कामगिरीवर शिक्षक न पाठविता कायमस्वरूपीसाठी शिक्षक शाळेमध्ये न मिळाल्यास पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीवर मोर्चा आणण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक मागणीवरून कुंभवडे ग्रामस्थ विरुद्ध पंचायत समिती पदाधिकारी, प्रशासन असा संघर्ष पेटण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: ratnagiri news no teacher in Kunbhavade school