हर्णै, पाजपंढरीला ‘ओखी’चा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

रत्नागिरी/हर्णै - गुजरातच्या दिशेने गेलेल्या ओखी चक्रीवादळाचा प्रभाव सलग दुसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीवर जाणवत होता. वेगवान वाऱ्यासह उधाणाच्या भरतीमुळे किनारपट्टीवासीयांची तारांबळ उडाली होती. सर्वाधिक फटका हर्णै, पाजपंढरीला बसला.

रत्नागिरी/हर्णै - गुजरातच्या दिशेने गेलेल्या ओखी चक्रीवादळाचा प्रभाव सलग दुसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीवर जाणवत होता. वेगवान वाऱ्यासह उधाणाच्या भरतीमुळे किनारपट्टीवासीयांची तारांबळ उडाली होती. सर्वाधिक फटका हर्णै, पाजपंढरीला बसला. उधाणाचे पाणी घरात घुसल्याने येथील लोकांना सोमवारी (ता. ४) रात्री स्थलांतर करावे लागले. वादळाचा प्रभाव आणखीन ३६ तास राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले

ओखीचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसण्याच्या शक्‍यतेने सर्वजणं सतर्क झाले होते. उधाणाचे पाणी किनारी भागातील लोकवस्तीत घुसेल या शक्‍यतेने पोलिसांसह महसूल प्रशासनाने काळजी घेतली होती. रात्रभर गस्त सुरू होती. आज दिवसभर थांबून थांबून पाऊस होता. दुपारनंतर कडकडीत ऊन पडले. ओखीचा प्रभाव असला तरीही व्यवहार नित्यनेमाने सुरू होते. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी दीड मिमी पावसाची नोंद झाली.

हर्णै, पाजपंढरी, मुरूड किनारपट्टी या वादळाने हादरून गेली. जीव मुठीत घेऊन येथील ग्रामस्थ राहत आहेत. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून रात्रभर गस्त सुुरू होती. समुद्राने रौद्ररूप धारण केले नसल्याने स्थलांतराची वेळ आली नाही. ग्रामस्थांची तारांबळ सुरू असताना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुठेच दिसत नव्हती. ९० टक्‍के मासेमारी नौका जयगड खाडीत उभ्या आहेत. नौकामालक आणि खलाशी जयगडमध्येच वास्तव्य करून आहेत. मुरूड येथे उधाणाचे पाणी किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये शिरले होते. त्यामुळे मालकांची तारांबळ उडाली.

रातोरात सामान हलविण्यात आले. मोठ्या लाटांमुळे किनाऱ्यांवरील सुरूची झाडे उन्मळून पडली होती. बागांमध्येही पाणी शिरले. सालदुरेत घरांच्या अंगणापर्यंत पाणी आले होते. हर्णै बंदर मोहल्ल्यातही तीच स्थिती होती. मच्छीमारांच्या १०० छोट्या नौका (डिंग्या) वाहून गेल्या आहेत. फत्तेगडाच्या पायथ्याशी दोन डिंग्या सापडल्या. त्या मच्छीमारांनी सुरक्षित बाहेर काढल्या.

एका डिंगींची किंमत ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत आहे. मच्छीमारांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. हर्णैत संरक्षक बंधारा नसल्याने येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन रात्रभर जागेच होते. किनारपट्टीलगत असणाऱ्या बहुतांशी लोकांच्या घरात पाणी शिरले होते. येथील अनिल खोपटकर, महेंद्र खोपटकर, जगदीश चोगले, लखमा तांडेल, मधुकर चोगले, कमल पालेकर, अनंत चोगले, महादेव चोगले, गणेश पाटील, जनार्दन पाटील, बाळकृष्ण पावसे, प्रकाश पावसे, सुरेश पावसे, जनार्दन पावसे, गजानन पावसे, गजानन पाटील, मनोहर पाटील, गणेश पावसे, येथील गजानन महाराज मंदिर आदींच्या घरात पाणी शिरले होते. रात्री उशिरा पोलिसांनी सर्वांना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. काहींचे सामानही वाहून गेले होते. येथे संरक्षक भिंत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढविल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

दापोली तालुक्‍यात मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता रिमझिम पाऊस झाला. शहर परिसरातही ढगाळ वातावरण होते. ओखीच्या शक्‍यतेने शाळांना सुटी जाहीर केली होती; मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ही माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे दापोलीत शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी शाळेत आले होते. त्यांना परत फिरावे लागले. वादळामुळे गोवा, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ येथील ९८ नौका दाखल झाल्या आहेत. त्यावर १५९२ खलाशी आहेत. त्यात तुळसुंदला ४७, मिऱ्याजवळ २६, भगवती बंदरात १०, जयगडला १५ बोटी आहेत. त्यावरील खलाशांना जाणीव फाउंडेशनसह स्थानिक संस्थांनी धान्य पुरवठा केला. भाटकरवाडा येथील किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौका उधाणाच्या पाण्यात रात्री वाहून जात होत्या. सुदैवाने हे लक्षात आल्यानंतर खलाशांनी त्या पकडून सुरक्षित ठिकाणी हलविल्या. तालुक्‍यातील किनारी भागांची तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी पाहणी केली.

 तालुकानिहाय आकडेवारी

  •  मंडणगड    २.७०
  •  दापोली     ३.००
  •  चिपळूण    ५.६०

परराज्यातील नौका जिल्ह्यात आल्या आहेत. त्यावरील खलाशी सुखरूप आहेत. तमिळनाडू, केरळमधील राज्यमंत्र्यांनी त्यांच्या सुरक्षिततेचा दूरध्वनीवरून आढावा घेतला. वादळाचा प्रभाव ३६ तास राहील असा अंदाज आहे. तोपर्यंत परराज्यातील नौकांसह स्थानिक मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
- अभिजित घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी

दृष्टीक्षेपात वादळ

  • मुरूडला पाणी हॉटेलमध्ये शिरले 
  • वादळाच्या प्रभावाने दिवसभर पाऊस
  • जिल्ह्यात परराज्यातील ९८ नौका
  • ठिकठिकाणी समुद्राला उधाण
  • रात्रभर पोलिसांची गस्त
  • नौका वाहिल्याने लाखोंचे नुकसान
Web Title: Ratnagiri News Okhi hit Herne, Pajpandhari