लांज्याजवळ डंपर दरीत कोसळून एक ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

लांजा - मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा डंपर झाडाला धडक देऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. या अपघातात 1 मजूर ठार, तर 17 जण जखमी झाले. 

लांजा - मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा डंपर झाडाला धडक देऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. या अपघातात 1 मजूर ठार, तर 17 जण जखमी झाले. 

लांज्यापासून अवघ्या दोन किमी अंतरावरील बागेश्री येथे हा अपघात झाला. लांजातून राजापूरला कामगारांना घेऊन जाणारा डंपर (क्र. एम एच 08 एच 1962) भरधाव वेगाने चालला होता. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व डंपर झाडावर आदळला. अपघाताची भीषणता एवढी होती की, महामार्गालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला डंपरची धडक बसताच झाड जमीनदोस्त होऊन डंपर दरीत कोसळला.

या अपघातात मुकादम शिवाप्पा पवार हा जागीच ठार झाला. रेणुका इप्परंगी, मीनल मुद्यवार, महादेवी इप्परंगी, विमला इप्परंगी, शारदा सिरदोसी, सुमित्रा वडार, ज्योती गडेकरे, परशु गडेकरे, संजना आरगेर, चनाप्पा आरगेर, सददुदेवी कालिकोई, रंजना मुद्देवार, रेणुका आलूर, सत्या मुद्देवार, रेवती मुद्देवार, परशुराम कालिकोई (सर्व रा. कर्नाटक) जखमी झाले. हे सारे कामगार एका ठेकेदाराकडे काम करीत होते.

संदीप भोगटे (तळगाव- मालवण) हा चालकही जखमी झाला आहे. या अपघातातील अनेक जण गंभीर जखमी असल्याने तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच लांजा आणि कुवे येथील अनेक युवकांनी धाडस दाखवून जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत म्हणून लांजा शहरातील खासगी डॉक्‍टर देखील मदतीसाठी आले होते. लांजा पोलिसांनी देखील त्वरित मदतकार्य केले. या अपघाताचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.