मधमाश्‍यांच्या हल्ल्यात माजी सैनिकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

खेड - तालुक्‍यातील शिवतर येथील माजी सैनिकाचा मधमाश्‍यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. 2) सायंकाळी 7 वाजता घडली. विश्‍वनाथराव गणपत मोरे (वय 67) असे त्यांचे नाव आहे. 

खेड - तालुक्‍यातील शिवतर येथील माजी सैनिकाचा मधमाश्‍यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. 2) सायंकाळी 7 वाजता घडली. विश्‍वनाथराव गणपत मोरे (वय 67) असे त्यांचे नाव आहे. 

गुरांना वैरण आणण्यासाठी घराच्या मागे असलेल्या जंगलात ते गेले होते. त्यावेळी तेथील मधमाश्‍यांच्या पोळयाला त्यांचा चुकून हात लागला. चवताळलेल्या मधमाश्‍यांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले. संपूर्ण अंगभर मधमाश्‍या डसल्याने त्यांचे विष संपूर्ण शरीरात भिनले. नातेवाइकांनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने त्यांना उपचारासाठी चिपळूण येथे नेत असताना सायंकाळी 7 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी (ता. 3) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. मोरे यांच्या अंत्ययात्रेला आमदार संजय कदम, जिल्हा पचायत आरोग्य बांधकाम सभापती अरुण कदम, माजी जिल्हा पचायत गटनेते अजय बिरवटकर उपस्थित होते. 

तालुक्‍यातील शिवतर हे गाव सैनिकांचे म्हणून ओळखले जाते. 1965 च्या भारत-चीन आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात येथील सैनिकांनी सहभाग घेतला होता. पहिल्या व दुस-या महायुद्धात शिवतर गावातील अनेक माजी सैनिक शहीद झाले होते. त्याच गावचे असलेल्या माजी सैनिक विश्‍वनाथराव मोरे यांचा करुण अंत व्हावा, यामुळे सारेजण हळहळले.

भारतीय सीमेवर चीनी सैनिकांनी 1965 ला अतिक्रमण करून भारतीय सैन्य दलाच्या चौक्‍या उद्‌ध्वस्त केल्या होत्या. त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी मराठा बटालियनमध्ये असणा-या विश्‍वनाथराव मोरे यांनी निकराची लढाई करून चीनी सैनिकांना पिटाळून लावले. तसेच 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यावेळी त्यांनी अनेक पाकिस्तांनी सैनिकांचा खात्मा केला होता. अशा या शूर सैनिकाच्या आठवणी आज ग्रामस्थांनी जागविल्या. 

(या बातमीत प्रसिद्ध झालेले चुकीचे छायाचित्र बदलले आहे. चुकीबद्दल दिलगीर आहोत: टीम ई सकाळ)