हजार लोकांमागे फक्त एक पोलिस; तरी कामगिरी उजवी

हजार लोकांमागे फक्त एक पोलिस; तरी कामगिरी उजवी

मनुष्यबळाच्या अभावामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. तपासातील गुणात्मक कामगिरीमुळे अजून तरी खाकी वर्दीला जिल्ह्यात डाग लागलेला नाही. मात्र लोकसंख्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस यांच्यात तफावत आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ४० हजारावर असून त्यांच्या दिमतीला फक्त १ हजार ५६९ पोलिस आहेत. १ हजार ५० लोकांमागे १ पोलिस, असे प्रमाण पडते. त्यामुळे पोलिस दलावर किती ताण असेल याचा अंदाज येतो. मंत्र्यांचे दौरे, मोर्चे, आंदोलने यात पोलिस बळ अडकतेच.  गुन्ह्यांचे तपास, गस्त याचा भार मग सहन करणे कठीण जाते. रिफ्रेशर कोर्स, मार्गदर्शन शिबिर आदींद्वारे तणावमुक्तीचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांवर रिव्हॉल्व्हर रोखणे, गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या, ब्लेडने वार करून घेणे, असे गंभीर प्रकार कमी झाले आहेत. तरीही वाढीव १ हजार १०० पदे मंजूर व्हावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस दलाने शासनाच्या गृहविभागाला सादर केला आहे. 

जिल्ह्याला गुन्हेगारीची फार मोठी किनार नाही; परंतु १६७ कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचा यापूर्वी तस्करीसाठी वापर झाला. तेव्हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीमध्ये रत्नागिरीचे नाव होते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे घर देखील खेडमध्ये आहे. त्याचे नातेवाईक यापूर्वी येथे आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. एका नॉन बॅंकिंगच्या माध्यमातून राज्यात अनेकांना गंडा घालणारा सिद्धार्थ मराठे याने देखील रत्नागिरीचा आश्रय घेतला होता. मंदिरे, बॅंका फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीनेही रत्नागिरीत धुमाकूळ घातला होता. दिल्ली, मुंबईप्रमाणे सामूहिक बलात्काराचा गुन्हाही रत्नागिरीत घडला. या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिस दलाचे काम वाढले आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात टोळीयुद्धसदृश चकमकी झाल्या. मात्र ती मर्यादित राहिली. आपापसात लढून दोन्ही टोळ्या नामशेष झाल्या.  

जिल्ह्यात दरवर्षी सुमारे १ हजार ३०० च्या दरम्यान गुन्हे घडतात. त्यामुळे राष्ट्रीय गुन्ह्येगारीच्या तुलनेत आता रत्नागिरी मागे आहे, असे म्हणता येणार नाही. जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ४० हजारांवर आहे. परंतु या जनतेचे संरक्षण करण्यासाठी फक्त १५३३ पोलिस कर्मचारी आहेत. नऊ तालुक्‍यांमध्ये सुमारे १६ पोलिस ठाणी आहेत. त्यामध्ये नऊ सागरी पोलिस ठाणी आहेत. वीजनिर्मितीतील कोयना धरण, आरजीपीपीएल कंपनी, जिंदल या कंपन्यांबरोबर देशातील सर्वांत मोठा अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर (ता. राजापूर) येथे होऊ घातला आहे. जैतापूरला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. यासाठी झालेल्या आंदोलनांना हिंसक वळणही लागले आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढतो. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पोलिसांना स्थानिकांनी पाणीही नाकारले होते. मंत्र्यांचे दौरे, आंदोलने, मोर्चे, मारामारी किंवा जातीय तेढ, चोऱ्या, चोवीस तासांची ड्यूटी, गस्त आदींमुळे पोलिस कर्मचारी अक्षरशः पिचून गेले आहेत. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वरिष्ठांचे चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. बंदोबस्त आला तर या टोकाहून दुसऱ्या टोकाला जावे लागते. यामुळे पोलिस कर्मचारी प्रचंड तणावाखाली येतो. याचा परिणाम पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यावर होतो. 

कमी मनुष्यबळाचा गुन्ह्यांच्या तपास कामावर परिणाम होत आहे. अनेक गुन्हे ‘अनडिटेक्‍ट’ आहेत. धावपळ, ताण, वरिष्ठांचा दबाव आदींमुळे पोलिसांच्या स्वास्थ्याचा व त्यामुळे गुन्हे शोधण्याच्या क्षमतेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या अनुषंगाने आणखी ११०० जादा पदे भरण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शासनाला सादर केला आहे. जिल्ह्याला गुन्हेगारीची मोठी पार्श्‍वभूमी नसली तरी कोकण रेल्वे, जलमार्ग, हवाईमार्ग, महामार्ग आदीमुळे मुंबई, पुणे, कर्नाटक, बेळगावसह परजिल्ह्यातील गुन्हेगार रत्नागिरीच्या आश्रयाला येऊ लागले. पश्‍चिम महाराष्ट्र किंवा अन्य जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्याचा वर्षाचा क्राईम रेट तो रत्नागिरी जिल्ह्याचा क्राईम रेट आहे. 

कर्तव्य बजावताना ना घर, ना कुटुंब, ना स्वास्थ्य! 
जिल्ह्याचा विस्तार, लोकसंख्या यांच्या तुलनेत आमचे मनुष्यबळ फारच कमी आहे. त्याचा मोठा परिणाम आमच्यावर होतो. दिवसभर ड्यूटी करून आठवड्यातील पाच दिवस रात्रीच्या गस्तीला नियुक्ती केली जाते. त्यामुळे कर्तव्य बजावताना ना घर, ना कुटुंब आणि नाही मुलांना वेळ देता येत नाही. जेवणाची ओरड असते. त्याला वेळ काळ नाही. मुख्यालयात असलेले कर्मचारी तर संवेदनशील ठिकाणी ३-३ महिने बंदोबस्तासाठी बाहेर असतात. त्यांना कौटुंबिक सुख कोठून मिळणार. चोवीस तास ड्यूटी करून वरिष्ठांचा प्रचंड दबाव. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य धोक्‍यात आहे. कर्मचाऱ्यांना सर्व कामांना जुंपले जाते. त्यामुळे गुन्ह्यांचा योग्य तपास करण्यात वेळच मिळत नाही, अशी खंत नाव न छापण्याच्या अटीवर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस मनुष्यबळ कमी असले, तरी आमची गुणात्मक कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची पोलिस दलाची तयारी आहे. गुन्हेगारी आजही नियंत्रणात आहे. तरी भविष्यात पोलिस दलात ११०० जादा पदे मंजूर व्हावी, यासाठी शासनाला प्रस्ताव दिला आहे. 
- प्रणय अशोक, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

...असे आहे पोलिस मनुष्यबळ
पोलिस अधीक्षक    १
अपर पोलिस अधीक्षक    १
डीवायएसपी    ४
पोलिस निरीक्षक    २३
अधिकारी सुमारे    ७०
सहायक पोलिस निरीक्षक    २१ 
सहायक पोलिस निरीक्षक    ३६

एकूण कर्मचारी    १५३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com