अवयवदान, देहदान पदयात्रेला रत्नागिरीत उदंड प्रतिसाद

अवयवदान, देहदान पदयात्रेला रत्नागिरीत उदंड प्रतिसाद

रत्नागिरी -  मरणोत्तर नेत्रदानाबद्दल बहुतांश लोकांना माहिती असते. मात्र मरणोत्तर हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड या अवयवांसह त्वचेचेही दानही करता येते. याची माहिती व्हावी याकरिता  मुंबईच्या अवयव व देहदान महासंघाने पदयात्रा आयोजित केली आहे.

मुंबई ते गोवा पदयात्रा आज सकाळी  रत्नागिरी येथे दाखल झाली. पदयात्रेला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी अवयवदान, देहदान करण्याची इच्छा प्रकट करून अजही भरले.

रत्नागिरीत यात्रेचे जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वागत केले. अवयवदान मोहीम जास्तीत लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता 60 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन पदयात्रा सुरू केली आहे. अवयवदान, देहदान करण्याची मानसिकता वाढली पाहिजे, हे पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयाजवळून 23 फेब्रुवारीला पदयात्रेस सुरवात झाली. विविध टप्पे पार करत गणपतीपुळे, शिरगावमार्गे पदयात्रा आज येथे आली. परटवणे येथे पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्यलक्ष्मी चौक, गोखले नाका, मारुती आळी, एसटी स्टँड, जयस्तंभमार्गे जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत पदयात्रा काढली. यामध्ये दी यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लायनेस क्लब ऑफ रत्नागिरीचे सदस्य शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी सहभागी झाले.

पदयात्रेत चित्रफीत, भाषणांद्वारे अवयवदानाबद्दल जागृती केली जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रेची सांगता 15 एप्रिलला मडगाव-गोवा येथे होणार आहे. पदयात्रेत यामध्ये 60 वर्षांवरील पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे, चंद्रशेखर देशपांडे, शैलेश देशपांडे, प्रियदर्शन बापट, नारायण म्हसकर, दत्तात्रय कुलकर्णी, रणजित उंदरे, शरद दाउदखानी, प्रमोद पवार आदी सहभागी झाले आहेत.

एकाने नेत्रदान केल्यामुळे किमान दोन व अधिक व्यक्तींना दृष्टीलाभ होतो. मृत्यूनंतर जास्तीत जास्त सहा तासांच्या आत नेत्र, त्वचा व देहदान या सर्व प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. अवयवदान करणारे व अवयवांची गरज असणारे रुग्ण यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे. अवयव न मिळाल्यामुळे 22 व्यक्ती मरण पावतात. दर दहा मिनीटाला एका व्यक्तीची त्यात भरत पडते.

- पुरुषोत्तम पवार

संस्थापक सदस्य, अवयवदान महासंघ 

मेंदूवरील अतिरिक्त ताण, अपघात किंवा इतर कारणांमुळे मेंदू मृत झाल्यास त्याला ब्रेन डेथ म्हणतात. अशा व्यक्ती आयसीयूमध्ये असल्याने व्हेंटिलेटरद्वारे त्याच्या शरीरातील अवयवांना जास्तीत जास्त 48 तास रक्तपुरवठा चालू ठेवता येतो. हे अवयव किमान आठ व्यक्तींना जीवदान देऊ शकतात. अनेक दात्यांची अवयवदानाची इच्छा मृत्यूनंतर नातेवाइकांच्या भावनिक उदासिनतेमुळे पूर्ण होत नाही. त्यामुळे आपली इच्छा जवळचे नातेवाइक किंवा मित्रपरिवाराला कौटुंबिक किंवा वाढदिवसासारख्या कार्यक्रमात एकत्र आले असताना व्यक्त केली तर अधिक परिणामकारक ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com