सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी भौतिक केंद्र ठरतेय वरदान

सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी भौतिक केंद्र ठरतेय वरदान

रत्नागिरी - सेरेब्रल पाल्सी (सीपी) रुग्णांसाठी सीएसआरअंतर्गत भौतिक उपचार केंद्र चालवणारी फिनोलेक्‍स इंडस्ट्री ही भारतातीत एकमेव कंपनी ठरली आहे. मुकुल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून कंपनी हा उपक्रम रत्नागिरी व डेरवण येथे राबवते. नियमित ४०-५० रुग्ण याचा लाभ घेतात. बहुविकलांगपणात नियमित उपचारांची गरज असते. ती गरज या केंद्रातून पूर्ण होत असल्याने या रुग्णांमध्ये सुधारणा होत असून त्यामुळे पालकांचा आत्मविश्‍वास वाढत आहे.

फिनोलेक्‍सतर्फे सातारा, वाई, पाचगणी, पाटण आणि रत्नागिरी, चिपळूण येथे भौतिक उपचार केंद्र चालवले जाते. फिनोलेक्‍सच्या २०१४ च्या सायक्‍लोथॉन व शालेय आरोग्य तपासणीवेळी सातारा येथील सीपी रुग्णांसाठी फाऊंडेशनने राबवलेल्या उपक्रमाची चित्रफीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पाहिली. त्यांनी येथे असा उपक्रम राबवा, अशी सूचना केली व पत्रही दिले. त्यानंतर शिबिरे घेऊन रत्नागिरीत १३७ व कामथे येथे १०० जणांची तपासणी करण्यात आली.

रुग्णांची गरज जाणून १२ जणांवर शस्त्रक्रिया, २० जणांना फूट कॅलिपर, व्हिलचेअर्सचे वितरण केले. २९ मे पासून फिनोलेक्‍स गेस्ट हाऊस येथे भौतिक पुनर्वसन केंद्र सुरू झाले. येथे सोमवार ते शनिवारी नियमित फिजिओथेरपिस्ट असतात. मंगळवार, गुरुवारी वाचाउपचारतज्ज्ञ उपचार करतात. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाशी सामंजस्य करार करून तेथे मुकुल माधव फाउंडेशनने जूनपासून भौतिक उपचार केंद्र सुरू केले.
रत्नागिरीच्या केंद्रामध्ये येण्याजाण्यासाठी कंपनीने वाहन व्यवस्था केली आहे. वीस किलोमीटर टप्प्यातील रुग्ण, पालक येथे येतात. नियमित ४० जण येथे उपचार घेतात.

पुण्यातील न्यूरोफिजिओथेरपीस्ट डॉ. सलोनी राजे दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी उपचार करतात. बहुविकलांग अर्थात मेंदूशी निगडीत आजार, स्वमग्नतेने ग्रस्त असणारे रुग्णही येथे येऊन उपचार घेऊ लागले आहेत. उपचारासाठी एकावेळी नाममात्र १० रुपये आकारले जातात. याचा विनियोग सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी केला जातो. यातून कंपनीने सामाजिक बांधिलकीही जपली.

माझा मुलगा सहावीमध्ये शिकतोय. नियमित उपचारांमुळे त्याच्यात सुधारणा होत आहे. कंपनीने गाडीची सोय 
केल्याने उपचार केंद्रात जाणे सोपे पडते. चांगले 
उपचारही मिळतात.
- श्रद्धा सुर्वे
 

रुग्णवाहिकांची मदत मिळावी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानातून या उपक्रमासाठी रुग्णवाहिकांमधून रुग्ण नेण्याआणण्याची जबाबदारी शासनाने घेतली तर लांबवरून येणाऱ्या रुग्णांना त्याचा उपयोग होईल. १३७ पैकी ४० ते ६० जण या उपचारांचा लाभ घेतात. मात्र अन्य रुग्णांना नियमित उपचार घेता येत नाहीत. डॉक्‍टरांचे मानधन, वाहतूक व्यवस्था व केंद्र व्यवस्थापनावर दरमहा सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्च होतात. मात्र शासकीय यंत्रणेचे फारसे सहकार्य मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com