खड्ड्यांमुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतुकीत घट

राजेश शेळके
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मृत्यूचा सापळा म्हणूनच मुंबई-गोवा राष्ट्रीय आणि रत्नागिरी-कोल्हापूर राज्य महामार्गाची ओळख बनू पाहत होती. मात्र आता खड्ड्यांत गेलेला महामार्ग म्हणून ओळख झाली आहे. दळणवळणावर याचा (ट्रॅफिकवर) मोठा परिणाम झाला आहे. महामार्गावरील ४० ते ५० टक्के ट्रॅफिक कमी झाली आहे.

मृत्यूचा सापळा म्हणूनच मुंबई-गोवा राष्ट्रीय आणि रत्नागिरी-कोल्हापूर राज्य महामार्गाची ओळख बनू पाहत होती. मात्र आता खड्ड्यांत गेलेला महामार्ग म्हणून ओळख झाली आहे. दळणवळणावर याचा (ट्रॅफिकवर) मोठा परिणाम झाला आहे. महामार्गावरील ४० ते ५० टक्के ट्रॅफिक कमी झाली आहे. एक्‍स्प्रेस हायवेकडे ही वाहतूक वळली असून कोकणात येण्यासाठी कुंभार्ली घाट, आंबा घाट, अणुस्कुरा किंवा फोंडा घाटाचा पर्याय वाहनधारकांनी शोधला आहे. तीन वर्षांमध्ये अपघातांचे प्रमाण घटले आहे. २०१५ ला सुमारे १ हजार ९ अपघात झाले होते. यावर्षी फक्त ५९६ अपघात झाले. वाहतूक घटणे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम करणारे ठरणार आहे.

जिल्हा वाहतूक शाखा आणि हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्षाला हजाराच्या दरम्यान महामार्गावर अपघात झाल्याची नोंद आहे. दीडशे ते शंभर लोकांचा यात बळी जातो. हजारो जखमी आणि जायबंदी होतात. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरटीओ, वाहतूक पोलिस, जिल्हा प्रशासन आदींनी अनेक उपाययोजना केल्या; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

खेड तालुक्‍यातील कशेडी घाट ते सिंधुदुर्ग दरम्यानच्या सुमारे ४०० किमीच्या मार्गावरील सुमारे २०० किमी मार्गात अवघड वळणे आहेत. परजिल्ह्यातील चालकांना हा महामार्ग नवखा आणि अवघड वळणाचा वाटतो. शिवाय ७५ टक्के वाहनचालक या मार्गावरील नियम धाब्यावर टाकून वाहने हाकतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे मत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या काही वर्षांमध्ये चौपट वाढली आहे. या मार्गावरून दररोज दोन हजारांपेक्षा अधिक वाहने ये-जा करतात. त्यात ३५ ते ४० टक्के अवजड वाहनांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यांत सरळ रस्ते असल्याने वाहने वेगाने चालविण्यात अडचणी येत नाहीत. 

कोकणात तशी स्थिती नाही. त्यातच महामार्गाची पुरती चाळण झाल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. कोकणचा प्रवास कंबरडे मोडणारा ठरत आहे. खड्ड्यांचा वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. साधारण ४० टक्के ट्रॅफिक कमी झाली आहे. एक्‍स्प्रेस हायवेचा वाहनधारक वापर करून कोकणात येत आहेत. कुंभार्ली घाट, आंबा घाट किंवा अणुस्कुरा घाटातून रत्नागिरीत येतात. अणुस्कुरा आणि फोंडा घाटांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरतात. त्यामुळे महामार्गावरील ट्रॅफिक कमी झाली आहे. अपघात घटण्याचे हे एक कारण आहे. दुसरे म्हणजे महामार्ग वाहतूक पोलिसांची कारवाई आदींमुळेही अपघातांचे प्रमाण घटले आहे. वाहतूक कमी झाल्याचा थेट परिणाम जोडव्यवसायावर झाला आहे. हॉटेल, ढाबे, पंक्‍चर, टायर, ऑइल व्यावसायिक आतबट्ट्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वडखळ सोडले की खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. जीव मुठीत घेऊन या महामार्गावरून वाहन चालवावे लागते. जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी अपघातांचे प्रमाण खूप कमी आहे. महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे गेल्या तीन वर्षांत ४१४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
- ए. ए. खान, 
पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, रत्नागिरी

हायवे ट्रॅफिककडून वाहनधारकांवर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे अपघात कमी होत आहेत. महामार्गावर प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे मोठी वाहने एक्‍स्प्रेस हायवेवरून कोकणात येतात. त्यासाठी कुंभार्ली घाट, आंबा, अणुस्कुरा आणि फोंडा घाटाचा वापर करून कोकणात येतात. महामार्गावरील वाहतूकच ४० टक्के कमी झाल्याने अपघात कमी झाले आहेत.
- बी. एन. यादव, 
पोलिस निरीक्षक, हातखंबा वाहतूक मदत केंद्र