एस.टी. सेवा नसल्याने येडगेवाडीतील १६ विद्यार्थी प्रवेशाविना घरी

संदेश सप्रे
गुरुवार, 15 जून 2017

मुळात हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकिचा असल्याने ग्रामसभेचा ठराव उपयोगाचा नाही असा ग्रामस्थांचा दावा आहे.

देवरुख : संपूर्ण महाराष्ट्रात आज शाळेचा पहीला दिवस विद्यार्थी आनंदाने साजरा करत असताना संगमेश्वर तालुक्याच्या येडगेवाडीतील एकूण १६ विद्यार्थी पर्यायी व्यवस्थेअभावी घरी बसून आहेत . आपल्या पाल्यांना शाळेत कसे पाठवायचे ही चिंता पालकांना सतावत आहे येडगेवाडीतील १६ विद्यार्थ्यांना कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदीर कुंभारखाणी येथे प्रवेश घ्यायचा आहे हे हायस्कुल येडगेवाडी पासून १९ कि.मी अंतरावर आहे .  हायस्कुल ला जाण्यासाठी एस.टी बस ची आवश्यकता आहे मात्र ती उपलब्ध होऊ न शकल्याने आपल्या पाल्यांना घरी बसवण्याची वेळ पालकांवर येवून ठेपली आहे.

चिपळूण आगारातून सकाळी ७.४५ वा सुटणारी चिपळूण - पाचांबे ही बस येडगेवाडी पर्यंत सोडण्यासाठी रत्नागिरी विभागिय नियंत्रकांकडे वारंवार मागणी करण्यात आली मात्र ही बस सुरु करण्यासाठी  विभागिय नियंत्रक कार्यालयाने  ग्रामसभेचे ठराव मागितले. मुळात हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकिचा असल्याने ग्रामसभेचा ठराव उपयोगाचा नाही असा ग्रामस्थांचा दावा आहे. यामुळे १६ विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहणार आहेत एस.टी विभागाने याची दखल घेवून सकाळची  चिपळूण - पाचांबे ही येडगेवाडीपर्यंत सोडावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राजिवली ग्रामपंचायतीचा खुलासा
कुचांबे काॅलनी ते येडगेवाडी हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकीचा आहे या रस्त्यावर बस सुरु करण्यासाठी व बंद करण्यासाठी नाहरकत दाखला व तत्सम अधिकार हे पाटबंधारे विभागाचे आहेत त्यामुळे एस.टी ने आमच्याकडून मागितलेला ग्रामपंचायत ठराव गैर आहे व आमच्या ग्रामसभेत या विषयावर खुली चर्चा करुन एस.टी ला कोणताच ठराव द्यायचा नाही अशा एकमताने ठराव मंजूर केलेला आहे त्यामुळे येडगेवाडीत एस.टी बस सुरु करण्याबाबत एस.टी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा ग्रामपंचायतीकडे टोलवू नये.
- जयश्री कदम,
सरपंच, ग्रूप ग्रामपंचायत राजिवली