राजापूरचा विकास आराखडा रडतखडत

राजापूरचा विकास आराखडा रडतखडत

राजापूर - शहराचे क्षेत्र मर्यादित मात्र दिवसागणिक शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असल्याने भविष्याचा वेध घेऊन शहराचे सुयोग्य नियोजन आवश्‍यक आहे. नियोजनपूर्वक विकासासाठी शहराची स्थिती लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी आवश्‍यक असलेली माहिती गोळा करणे, अद्ययावत नकाशा मिळण्यासाठी सिटी सर्वेक्षणाचे काम गेल्या सात वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. सिटी सर्वेक्षणाच्या झालेल्या कामाची फेरतपासणी करण्यात भूमिअभिलेख विभागातील अपुरा कर्मचारीवर्ग हा मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे सिटी सर्वेक्षणाच्या अहवालाची प्रतीक्षा आणखी काही वर्षे करावी लागणार आहे.   

बाराव्या वित्त आयोगाचा निधी 
शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अद्ययावत नकाशा गरजेचा आहे. शहराचे सिटी सर्वेक्षण व्हावे यासाठी पालिकेने संबंधित खात्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला. त्याची शासन दरबारी दखल घेऊन २००५-०६ मध्ये संबंधित खात्याकडून शहराच्या सिटी सर्वेक्षण कामाला मान्यता मिळाली. यासाठी येणाऱ्या खर्चापोटी पालिकेने १२ व्या वित्त आयोगातून सुमारे २३ लाख  १० हजार रुपयांचा निधीही मंजूर करून संबंधित खात्याकडे जमा केला. सध्या होत असलेल्या सिटी सर्वेक्षणामध्ये शहराच्या ४३१.१९ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. त्याचा ठेका पुणे येथील प्रशांत सर्व्हेज कंपनीला देण्यात आला असून ऑक्‍टोबर २०१० मध्ये या कामाचा प्रारंभ झाला. 

सिटी सर्वेक्षणाद्वारे माहिती संकलन 
या सिटी सर्वेक्षणामध्ये डीजीपीएस तंत्राद्वारे सर्वेक्षण करून शहराची सविस्तरपणे माहिती गोळा करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांमध्ये जाणारे छोटे-मोठे कच्चे आणि पक्‍क्‍या स्वरूपातील रस्ते, शहरातील एकूण इमारती, कंपाउंड वॉल, 
गटारांची संख्या, शहरातील पाण्याची व्यवस्था, शहराची हद्द याची नोंद होईल. 

सिटी सर्वेक्षणामुळे काय होणार ज्ञात? 
या सर्वेक्षणामुळे शहरातील अविकसित राहिलेला भाग कोणता हे स्पष्ट होणार आहे. शहराच्या कागदोपत्री असलेली हद्दीमध्ये नोंद असूनही सर्वमान्यांना ज्ञात नाही तो भाग उजेडात येणार असून साऱ्यांना ज्ञातही होणार आहे. त्यातच शहरातील एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर, त्याचा कशाप्रकारे विकास करणे शक्‍य आहे याविषयी मार्गदर्शनही या सिटी सर्वेक्षणामुळे होणार आहे. शहराची अद्ययावत रचनाही स्पष्ट होईल. शहरातील किती भाग लोकांकडून सध्या वापरात आहे, याबाबतही माहिती पुढे येणार आहे.  

विकास आराखड्यासाठी सर्वेक्षणाचे महत्त्व 
राजापूर शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी भविष्यात प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. हा विकास आराखडा तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेली विविध आणि अत्यावश्‍यक माहिती, शहराची हद्द स्पष्ट करणारा अद्ययावत नकाशा या सिटी सर्वेक्षणाद्वारे मिळणार आहे. त्यामुळे या सिटी सर्वेक्षणाला विशेष महत्त्व आहे. 

प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी आवश्‍यक 
शहरातील जमीनमालकांची नावे त्यांच्या सात-बारा उताऱ्यांना नोंद आहेत. मात्र, सिटी सर्व्हेक्षण झाल्यानंतर मुंबईच्या धर्तीवर भविष्यात शहरातील जमीनमालकांना त्यांच्या जमीन वा अन्य मालमत्तेची माहिती देणारे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.  

कामात अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा अडथळा
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सिटी सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल भूमिअभिलेख कार्यालयाकडे द्यावयाचा आहे. त्या अहवालाची फेरतपासणी भूमिअभिलेख कार्यालयाने करावयाची आहे. सत्तर टक्केहून अधिक केलेल्या कामाचा अहवाल आणि नकाशाची प्रत प्रशांत सर्व्हेजने भूमिअभिलेख कार्यालयाकडे दिली आहे. पूर्वी ठरल्याप्रमाणे दिलेल्या अहवालाची फेरतपासणी करावयाची आहे. मात्र, भूमिअभिलेख कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे ही फेरतपासणी वेळेत होत नाही. 

प्रशांत सर्व्हेजकडून शहराच्या सिटी सर्वेक्षणाच्या पूर्ण झालेल्या कामाचा अहवाल आणि नकाशाची प्रत त्यांनी फेरतपासणीसाठी आपल्याकडे सादर केली आहे. मुळातच भूमिअभिलेख कार्यालयामध्ये अपुरा कर्मचारी, त्यातच, कार्यालयातील नियमित कामे यामुळे या कामास वेळ लागणार आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. लवकरच फेरतपासणीचे काम हाती घेण्यात येईल.
- जी. एल. गिजबिले, 
   शिरस्तेदार भूमिअभिलेख विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com