माझ्यावरील अविश्‍वासाची कारणे शोधतोय : सावंत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

रत्नागिरी पालिकेतील उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा मी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याकडे दिला. कोणत्याही दबावाखाली नाही. शिवसेनेने पद दिले म्हणून जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, तत्कालीन शहरप्रमुखांचा मान ठेवून स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. माझ्यावर विनाकारण अविश्‍वास दाखविण्यात आला. त्याचे कारण मी आठ महिने शोधतोय.

- राजेश सावंत

रत्नागिरी - पालिकेतील उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा मी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याकडे दिला. कोणत्याही दबावाखाली नाही. शिवसेनेने पद दिले म्हणून जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, तत्कालीन शहरप्रमुखांचा मान ठेवून स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. माझ्यावर विनाकारण अविश्‍वास दाखविण्यात आला. त्याचे कारण मी आठ महिने शोधतोय. मला शिवसेना सोडायची नाही; परंतु जुन्यांनी नव्हे, तर आपल्याच लोकांनी मला यासाठी भाग पाडले. पक्ष सोडण्यापर्यंत माझी तयारी झाली आहे. विनाकारण पक्ष सोडला म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माफी मागणार, अशी खोचक प्रतिक्रिया राजीनाम्यानंतर राजेश सावंत यांनी दिली. 

सावंत यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केल्यानंतर त्यांच्यावर उपनगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा होती; मात्र आज दुपारी ते स्वतःहून पालिकेत आले. राजीनामा देण्याची पूर्वसूचना त्यांनी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना दिली होती. त्यानुसार त्यांनी श्री. पंडित यांच्या दालनात येऊन उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल पंडित यांनी तो मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. 

या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश सावंत म्हणाले, ‘‘गणपतीदरम्यान मी पदाचा राजीनामा देणार होतो; परंतु काही ज्येष्ठ लोकांनी थांबण्यास सांगितले. उपनगराध्यक्षपद हे पाच वर्षांचे होते; परंतु त्याबाबत पक्ष ठरवतो. या पदावरूनच वादाला सुरुवात झाली. मला पक्षातील काही लोकांचा विरोध होता, असे सांगितले, पण कोणाचा विरोध होता हे सांगितले नाही. त्यानंतर माझ्याविरुद्ध राजकारण केले गेले. माझ्यावर विनाकारण अविश्‍वास दाखविला गेला. विश्‍वासावर राजकारण चालते, शिवसैनिकांचा माझ्यावर विश्‍वास आहे; पण काही जवळचे, आपले लोक अविश्‍वास दाखवत आहेत. 

गेल्या आठ महिन्यांत मी उपनगराध्यक्ष म्हणून चांगले काम केले. पालिकेतील सर्व कर्मचारी आणि आमचे सर्व नगरसेवक (किशोर मोरेंना धरून) चांगले सहकार्य मिळाले. 

ते म्हणाले, ‘‘आता विश्‍वास दाखवायला माझे आहे कोण? शिवसैनिकांनी त्रास दिला नाही, आपल्याच लोकांनी हे कुंभाड रचले. सेना सोडायची माझी अजिबात इच्छा नाही; पण मला सोडण्यास भाग पाडले जात आहे. मी आमदार उदय सामंत यांच्याबद्दल वाईट बोललो नाही, बोलणारही नाही. २००४, २००९, २०१४ विधानसभा निवडणुकीत सामंत यांचे काम केले. १७ वर्षांमध्ये कधीही पदाची अपेक्षा केली नव्हती. लाचारी पत्करून पदे मिळवायची नाहीत. भविष्यात जिथे असेन त्या पक्षाचे प्रामाणिक काम करेन.’’ 

नगराध्यक्ष राहुल पंडित भावूक 
सावंत यांनी राजीनामा देण्यापूर्वी नगराध्यक्ष राहुल पंडित आणि त्यांच्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे गुप्त बैठक झाली. बैठकीमधून बाहेर पडल्यानंतर राहुल पंडित भावूक झाले होते. नगराध्यक्षांशी माझे चांगले संबंध आहेत. भविष्यातही कोणत्याही कामासाठी आलो तर त्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही केल्याचे सावंत यांनी सांगितले.

Web Title: ratnagiri news rajesh sawant comment on resign