आता फक्त काँग्रेस प्रवेश - रमेश कदम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

चिपळूण - काँग्रेसमध्ये जाण्याचा माझा निर्णय शेवटचा असेल. त्यानंतर घरी बसेन; पण कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केले. 

चिपळूण - काँग्रेसमध्ये जाण्याचा माझा निर्णय शेवटचा असेल. त्यानंतर घरी बसेन; पण कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केले. 

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी श्री. कदम यांनी येथील ब्राह्मण सहायक संघाच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन केले होते.

रमेश कदम म्हणाले की, ‘‘मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार इतर पक्षात प्रवेश केला होता; परंतु भाजपमध्ये गेल्यानंतर तेथे माझा मानसन्मान झाला नाही. पक्षाच्या बैठकांचे निमंत्रण नाही. कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. तरीही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्‍यातून २० हजार मते मी मिळवून दिली. उसाचा रसासाठी वापर करायचा आणि चोथा झाल्यावर फेकून द्यायचा ही भाजपची संस्कृती आहे. माझ्यासह कार्यकर्त्यांचीही निराशा झाली. कार्यकर्ते माझ्याशी आपल्या वेदना सांगू लागले. त्यामुळे मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

मी मूळ काँग्रेसचा. काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढलो. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी पुन्हा या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात मी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. जिल्ह्यात पक्ष वाढविला. जिल्ह्यात सध्या काँग्रेसची ताकद फारशी नाही; मात्र या पक्षात मी गेल्यानंतर पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन येतील. यात शंका नाही. कारण शून्यातून विश्‍व निर्माण करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. माझ्या प्रकृतीबद्दल कुणीही चिंता करण्याचे कारण नाही. भविष्यात किमान ३० वर्षे मी सक्रिय राजकारणात असेन.’’

Web Title: Ratnagiri News Ramesh Kadam comment