माजी आमदार रमेश कदमांचा चार नोव्हेंबरला काँग्रेस प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

चिपळूण -  चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचा औपचारिक काँग्रेस प्रवेश 4 नोव्हेंबरला होईल. महाड येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात हा प्रवेश होणार आहे. तब्बल 18 वर्षांनंतर रमेश कदम पुन्हा स्वगृही परतणार असल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता; परंतु तेथे घुसमट झाल्याने त्यांनी कमळाची संगत नुकतीच सोडली. 

रमेश कदमांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून फुलत होती; मात्र 1999 मध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर राज्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यामध्ये रमेश कदमांचा समावेश होता. चिपळुणातील राष्ट्रवादीचे संस्थापक अशी त्यांची ओळख होती.

माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याबरोबर त्यांचे राजकीय वैर आहे. जाधव शिवसेनेतून राष्ट्रवादीत आल्यानंतरही दोघांमधील वाद कायम राहिले. संस्थापक सदस्य असूनही माझ्यावर पक्षाने वारंवार अन्याय केला, असे कदम वारंवार सांगत. शेकापच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाले. चिपळूण पालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केवळ आठ महिन्यांनंतर कदमांनी भाजपला रामराम केला. 18 वर्षांनंतर ते आता पुन्हा कॉंग्रेसमध्ये सक्रिय होणार आहेत 

त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यात पक्षाला ताकद मिळेल. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कमी झाली होती. ती भरून काढण्यासाठी रमेश कदम यांच्यासारखा काँग्रेसच्या मुशीतील नेता काँग्रेसच्या गळाला लागला आहे. महाड येथे होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यात कदम आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह प्रवेश करतील. त्यानंतर कदम चिपळुणात काँग्रेसचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील. या मेळाव्यात रमेश कदम यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाईल. 

रमेश कदमांनी कॉंग्रेसमध्ये दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांचे आम्ही खुल्या मनाने पक्षात स्वागत करू. विरोधी पक्षांबरोबर लढण्यासाठी त्यांच्या रूपाने कॉंग्रेसला सक्षम नेता मिळाला आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही जिल्ह्यात कॉंग्रेस वाढवू. 

- इब्राहिम दलवाई, माजी जिल्हा उपाध्यक्ष कॉंग्रेस