रवींद्र माने पुन्हा शिवसेनेत

रवींद्र माने पुन्हा शिवसेनेत

देवरुख - माजी राज्यमंत्री रवींद्र माने पुन्हा शिवबंधनात अडकले आहेत. त्यांच्या स्वगृही परतण्याने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजू आणखी भक्कम झाली आहे. देवरूख नगपंचायतीची निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीला तर विधानसभा निवडणूक दीड वर्षानी होणार आहे.

२०१० ला शिवसेनेत घुसमट होत असल्याचे कारण देत रवींद्र मानेनी सेनेला जय महाराष्ट्र केला आणि डिसेंबर २०१० मध्ये पक्षाध्यक्ष आणि तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत जाहीर मेळाव्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याआधी २००६ ला सेनेचे तत्कालीन आमदार सुभाष बने नारायण राणेंचा हात धरत काँग्रेसमध्ये गेले होते. पाठोपाठच्या या धक्‍क्‍यांनी सेनेचे मोठे नुकसान होणार असा अंदाज होता, मात्र मानेंच्या पक्षत्यागानंतर २०१२ रोजी झालेली जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेने एकहाती जिंकली.

मानेंना राष्ट्रवादीत मानाचे पान देण्याची घोषणा करण्यात आली. गेल्या ७ वर्षांत केवळ नेते म्हणून ते मिरवले गेले. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाची चर्चा गेले वर्षभर सुरू होती. या गणेशोत्सवात त्या चर्चेला मूर्त रूप आले. आमदार सदानंद चव्हाण, सुभाष बने यांनी मानेंना सेनेत येण्याचे आवतण दिले आणि मानेनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. देवरुख नगरपंचायतीत मानेंच्या कृपेने काँग्रेस-राष्ट्रवादीला हाताशी धरत भाजप सत्ताधारी आहे. परिणामी मानेंचे स्वगृही जाणे भाजपसाठी धोकादायक ठरणारे होते. यामुळे त्यांच्या प्रवेशात गतिरोधक टाकण्याचे काम भाजपने केले, मात्र त्याला अपेक्षित यश आले नाही. 

गेले चार दिवस चव्हाण आणि बने हे मानेंच्या प्रवेशासाठी गळ टाकून बसले होते. यासाठी १२ तारखेचा मुहूर्त निवडण्यात आला होता, मात्र चांगल्या कामाला उशीर नको, असे म्हणत मानेंचा सेना प्रवेश आजच उरकून घेण्यात आला आहे.

सेनेची बाजू वरचढ
देवरूख नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सेना- भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता देवरुखात काटे की टक्कर पाहायला मिळेल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात सेनेची बाजू वरचढ होईल. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत सेनेने दिवाळीआधीच राजकीय फटाके फोडण्यास सुरवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com