जलयुक्त शिवारची अनेक कामे कोकणात निरुपयोगी - सनगरे

जलयुक्त शिवारची अनेक कामे कोकणात निरुपयोगी - सनगरे

रत्नागिरी - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ४० प्रकारच्या कामांपैकी अनेक कामे कोकणास पूरक नाहीत. येथील भौगोलिकतेचा विचार करता जलसंरक्षण, जलवृद्धीसाठी कामांचा प्राधान्यक्रम बदलावा लागेल. कोकण जलकुंड जलसाठवणूक उपक्रमांसाठी अधिक योग्य आहे. अनुदानाचे तसेच शेततळ्याचे निकष बदलण्याची आवश्‍यकता आहे. स्थानिक जनता व शेतकऱ्याच्या गरजा लक्षात घेऊन प्राधान्यक्रम ठरवावा लागेल, असे निरीक्षण प्रा. सचिन सनगरे यांनी नोंदवले आहे. 

गोगटे-जोगळेकरच्या समाजशास्त्र विभागातील प्रा. सनगरे यांनी मुंबई विद्यापीठात ‘जलयुक्‍त शिवार अभियानाचे रत्नागिरी तालुक्‍यातील जलसमस्या सोडविण्यातील योगदान’ हा संशोधन प्रस्ताव सादर केला. तालुक्‍यातील खेडशी, चाफे, वरवडे, पिरंदवणे व नाणीज या पाच गावांचा नमुना पद्धतीने अभ्यास केला. जमिनीचा प्रकार, उतार, चढाव, पाण्याचा अपधाव वेग, मॉन्सूनचा कालावधी, पावसाचे दिवस व प्रमाण अशा विविध भौगोलिक घटकांचे शास्त्रीय अध्ययन करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.

कामांचा प्राध्यान्यक्रम, मॉन्सूनोत्तर काळातील जलस्तराचा बंधाऱ्यांसाठी विचार, लोकसहभाग, वैयक्तिक लाभाच्या योजना आवश्‍यक, पीकपद्धतीचे अध्ययन अशा शिफारशीही केल्या आहेत. कृषी सिंचन पद्धतींसोबत, रोजगारनिर्मितीसंदर्भातही अभ्यास होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली आहे. रहिवासी व शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. बारमाही शेतीसाठी अध्ययन व सिंचनाच्या आधुनिक पद्धतींची सक्‍ती, रत्नागिरी तालुक्‍यातील पीकपद्धती विचारात घेणे अत्यावश्‍यक आहे. वाढते शहरीकरण आणि पाण्याच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करून योजना राबवल्या पाहिजेत. 

प्रा. सनगरे यांचे पाच शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. एसएनडीटी विद्यापीठाच्या सामाजिक मानववंशशास्त्र अभ्यास साहित्यनिर्मितीत त्यांचे योगदान आहे.

सिमेंट बंधारे निरुपयोगी
जानेवारीनंतर पाण्याचा स्तर लक्षात घेऊन बंधारे बांधावेत. पाणी वेगाने येत असल्याने गाळ येऊन सिमेंट बंधारे निरुपयोगी ठरतात. त्यामुळे जनतेचा पैसा वाया जातो. एप्रिल ते मॉन्सून सक्रिय होईपर्यंतच्या कामांचे नियोजन व्हावे. गाळ काढणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, स्थानिक जलप्रवाहांचे प्रदूषण यांचा विचार करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

समाजात जलसाक्षरतेची गरज आहे. स्थानिक शेती, शेतकरी व रोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने भविष्यकालीन संशोधन उपक्रम राबवण्याचा मानस आहे. हे संशोधन विद्यापीठ स्तरावर सादर झाल्यावर ते शासनाकडे देणार असून त्याचे पुस्तक प्रकाशित करणार आहे.
- प्रा. सचिन सनगरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com