किनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षा दुर्लक्षित

मयूरेश पाटणकर
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

भरती-ओहोटीच्या वेळी समुद्रातील पाण्याचा प्रवाह कसा आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी किती मार्ग आहेत, त्यांचे अंतर किती आहे. गावात उपचाराच्या कोणत्या सुविधा आहेत, याचा सर्वंकष अभ्यास करून प्रत्येक किनाऱ्यानुरूप आवश्‍यक सुविधांची उभारणी करता येईल. 

गुहागर - आरे-वारेतील अपघाताने समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक किनाऱ्याची रचना वेगळी आहे. दापोलीतील आंजर्ला, मुरूड, हर्णै, कर्दे हे किनारे समतल आहेत. भरतीचे पाणी आले तरीही गुडघाभर पाण्यात आपण सहज उभे राहू शकतो. मात्र, गुहागर, गणपतीपुळे, गणेशगुळे येथील किनाऱ्यांवर उंचवटे निर्माण होतात. सरळ चालताना अचानक आपण खड्ड्यात (चाळ) जातो. न घाबरता चालत राहिलो तर पुन्हा उंचावर येऊ शकतो. आरे-वारे किनारी खाडी मुख आहे. असेच वैविध्य प्रत्येक किनाऱ्यावरील प्रवाहातही आहे. त्यामुळे येथे कोणते धोके आहेत, भरती-ओहोटीच्या वेळी समुद्रातील पाण्याचा प्रवाह कसा आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी किती मार्ग आहेत, त्यांचे अंतर किती आहे. गावात उपचाराच्या कोणत्या सुविधा आहेत, याचा सर्वंकष अभ्यास करून प्रत्येक किनाऱ्यानुरूप आवश्‍यक सुविधांची उभारणी करता येईल. 

पुरेसा अभ्यास नाही
किनाऱ्यांमधील असलेले वैविध्य आणि भौगोलिक परिस्थितीतील बदल, धोक्‍याची ठिकाणे व त्या अनुषंगाने उपाय याचा अभ्यास झालेला नाही. याचे द्योतक म्हणजे आरे-वारे हे दोन किनारे आहेत. सरकारी कागदपत्रात त्यांची नोंद एकत्र म्हणजेच एक किनारा असल्याप्रमाणे आहे. त्यामुळे दोन्ही किनाऱ्यावर खर्च करण्यासाठी निधी मिळत नाही. तो फक्त एकालाच मिळतो. स्वाभाविक तेथे व्यवस्था उभी केली गेली तरी एकाच किनारी होणार. जीवरक्षक दोन ठिकाणी ठेवायचे असतील तर त्याची प्रथम दोन किनारे म्हणून नोंद झाली पाहिजे. 

फलक सकारात्मक हवेत
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील फलकांवरील मजकूर नकारात्मक आहे. हा समुद्रकिनारा पोहण्यासाठी धोकादायक आहे. येथे ... इतके पर्यटक बुडाले. समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकही पर्यटकांना आमचा समुद्र कसा धोकादायक आहे हेच सांगतात. पर्यटन व्यवसायाच्या वाढीवर यामुळे नकारात्मक परिणाम होतो. कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर आवश्‍यक असणारी भरती-ओहोटीची माहितीच लिहिली जात नाही. समुद्रस्नानासाठी कोणती जागा अधिक सुरक्षित आहे. हे सांगितले जात नाही. अनावश्‍यक मजकुरापेक्षा अत्यंत आवश्‍यक आणि सकारात्मक तसेच योग्य मार्गदर्शन करणारा मजकूर हवा. 

प्रशिक्षित जीवरक्षक
गणपतीपुळे व गुहागर येथे जीवरक्षकांची व्यवस्था उभी केल्यानंतर अनेक अपघात टळले. येथील जीवरक्षकांच्या व्यवस्थेत आजही अनेक त्रुटी आहेत. जीवरक्षकांना पुरेसे मानधन मिळत नाही. तरीदेखील प्राथमिक अवस्थेतील ही व्यवस्था उपयोगी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक किनाऱ्यावर व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रशिक्षित जीवरक्षकांची सुविधा निर्माण करणे आवश्‍यक आहे. जगातील अनेक देशात जीवरक्षकांना योग्य मोबदला आणि सन्मान मिळतो. त्यामुळे तेथे जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. गणपतीपुळे येथे तर किनारी व्यवसाय करणारेच जीव धोक्‍यात घालून पर्यटकांना वाचवतात. अशा व्यावसायिकांना किनाऱ्यावरून हटविण्यात आले. 

जीवरक्षकांकडे दुर्लक्ष
मुरूड (जि. रायगड) येथे पुण्यातील १४ विद्यार्थी बुडाल्यावर २०१६ मध्ये राज्य सरकारने समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहिले. साहित्य घेण्यासाठी निधी दिला; मात्र अत्यावश्‍यक असणाऱ्या जीवरक्षक या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले. स्वयंस्फूर्तीने काम करणारे मनुष्यबळ किनाऱ्यांवर ठेवण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली. यात विरोधाभास असा की, स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या हेतूबद्दल शंका नको; परंतु ते प्रशिक्षित नसतील तर काहीवेळा अनावस्था प्रसंग ओढवू शकतो. आज पोटापाण्यासाठी झगडणारा मनुष्य स्वयंसेवक म्हणून जीवरक्षकाचे काम कसे करेल. जीवरक्षकाला नियमितपणे योग्य पगार मिळाला, तर खऱ्या अर्थाने किनारे सुरक्षित होतील. 

आवश्‍यक साधनसामग्री
बुडणाऱ्याला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्‍यू बोर्ड, रेस्क्‍यू ट्यूब, समुद्राची स्थिती दर्शविणारे ध्वज, समुद्रातील सुरक्षित सीमारेषा दाखविणारे मार्कर बोये, समुद्रात आपटून बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या मानेला लावण्यासाठी स्टीफ नेक कॉलर, कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देणारे यंत्र, प्रथमोपचाराचे कीट आदी साहित्य जीवरक्षकांकडे असेल, तर पर्यटक ९० टक्के वाचू शकतात. आज समुद्रकिनाऱ्यांवरील ग्रामपंचायतीनी वॉच टॉवर उभे केलेत. लाईफ जॅकेट, मेगाफोन, लाईफ बोये, दोरखंड, दुर्बिण, डायविंग गॉगल्स्‌, बॅल्केट, दुर्बिण, शिट्टी, सर्च लाईट, स्ट्रेचर असे साहित्य विकत घेतले आहे; परंतु त्याचा वापर करणारे मनुष्यबळ नाही. 

गोव्यात सुरक्षा एजन्सी... 
गोव्या सरकारने समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी एजन्सी नेमल्या आहेत. त्या समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक नेमण्यापासून अन्य साहित्याची व्यवस्था करतात. प्रसंगी किनाऱ्यांचा विमा उतरवितात. अशा पद्धतीने अभ्यास करून समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेबाबतची योजना राज्यसरकारने करणे आवश्‍यक आहे. 

समुद्रात पोहण्याची क्षमता वाढविणे, साधनांचा उपयोग करून व स्वत:चा जीव सुरक्षित ठेवून पर्यटकाला समुद्रातून बाहेर काढणे, अपघातग्रस्ताला पाण्यातून कोणत्या स्थितीत आणायचे, किनाऱ्यावर करायचे प्राथमिक उपचार, समुद्र कसा वाचायचा, समुद्रात जाणारा तसेच वेगाने किनाऱ्याकडे येणार प्रवाह कोणता, समुद्र ध्वजांकित करणे, पर्यटकांशी संवाद साधणे याचे प्रशिक्षण जीवरक्षकांना दिले जाते.
- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, नगरपंचायत गुहागर

Web Title: ratnagiri news safety of tourists ignored on sea shores