शाळकरी मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

सावर्डे -  येथील खेराडेवाडीतील शाळकरी मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेला असताना त्याचा पाय घसरून पडला. यश मंगेश खेराडे (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे.

सावर्डे -  येथील खेराडेवाडीतील शाळकरी मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेला असताना त्याचा पाय घसरून पडला. यश मंगेश खेराडे (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे.

सावर्डे पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ७) दुपारी दोन वाजता खेराडेवाडी शेजारी असणाऱ्या विहिरीवरून पाणी आणतो असे आजीला सांगून तो गेला. बराच वेळ झाला तरी यश घरी आला नाही. म्हणून त्याला पाहण्यासाठी आजीने विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी विहिरीतील पाण्यात त्याच्या चपला तरंगत असल्याच्या दिसताच आजीने आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक जमा झाले. ग्रामस्थांनादेखील यश विहिरीत बुडाल्याचा संशय आला. त्यांनी मोठा गळ आणून पाण्यात सोडला. त्यावेळी त्याच्या पॅंटला हूक अडकल्याने त्याला बाहेर काढले. ग्रामस्थांनी त्याला डेरवण रुग्णालयात दाखल केले; पण त्यापूर्वीच त्याचा  मृत्यू झाला होता. शवविच्छेदन सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले. 

गरीब कुटुंबातील यश दहावीमध्ये निकम विद्यालयात शिकत होता. आई-वडील शेतकरी असल्याने ते दोघेही शेतावर गेले होते. त्यांना यशच्या दुर्घटनेची माहिती समजताच त्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. यश हा शांत आणि हुशार असल्याने खेराडेवाडीमध्ये तो सर्वांचा आवडता होता.