शिर्डी पदयात्रेत रत्नागिरीकरही

शिर्डी पदयात्रेत रत्नागिरीकरही

रत्नागिरी - विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी शेकडो वर्षे लाखांच्या गर्दीत होते. याच धर्तीवर शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी खार (पश्‍चिम, मुंबई) येथून पदयात्रा काढण्याचे ठरले. गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरू असून यामध्ये प्रतिवर्षी यात्रेकरूंची संख्या वाढत आहे. या पदयात्रेत रत्नागिरीतील ५० भाविक सहभागी होत आहेत. रत्नागिरीतून रेल्वेने खार (मुंबई) व तिथून पुढे शिर्डीला जाण्यासाठी या भाविकांची जोरदार तयारी सुरू आहे.

येत्या १० ते १९ डिसेंबर या कालावधीत पदयात्रा काढण्यात येणार आहे. द्वारकामाई दर्शन पदयात्री मंडळाची स्थापना दहा वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर खार ते श्री क्षेत्र शिर्डी साईरथ पालखी पदयात्रा सोहळा प्रतिवर्षी सुरू झाला. सुमारे २४० किमीची ही पदयात्रा आठ दिवसांत पूर्ण केली जाते. या सोहळ्यात दरवर्षी सहभागी होणाऱ्या साईभक्तांची संख्या वाढत आहे. पदयात्रा झाल्यानंतर २३ डिसेंबरला खार (प.) येथे श्री साई भंडारा, महापूजा व ‘एक शाम साई के नाम’ हा साई गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रवी जोशी यांनी दिली.

रत्नागिरीतून वीरेंद्र चव्हाण, दीप्तेश पाटील, अभिजित पाटील, वैभव पाटील आदींसह ७५ जण सहभागी आहेत. हे सर्वजण १० डिसेंबरला खार येथे रवाना होणार आहेत. सुरवातीला रत्नागिरीतून ठराविक लोक सहभागी होत होते. पदयात्रेच्या कालावधीत अनेकांना खूप चांगले अनुभव आले आहेत. त्यामुळे ही संख्या वाढून सुमारे एक हजार भाविक पदयात्रेत सहभागी होतात. पदयात्रेमध्ये रुग्णवाहिका, डॉक्‍टर्सची सोय असते. हॉटेल्स, धर्मशाळांमध्ये निवास व्यवस्था असते. कोणीही शौचालयास बाहेर जाऊ नये, अशी सक्त सूचना दिली असल्याने कोठेही घाण, कचरा केला जात नाही.

मी सलग दहा वर्षे जात आहे. पाणी, जेवण, नाश्‍ता व निवासाची चांगली व्यवस्था असते. प्रतिदिन ३० ते ४० किमी पायी चालतो. अध्यक्ष रवी जोशी व सहकारी सर्वांची आपुलकीने काळजी घेतात. गुटखा, तंबाखू खाणारे आढळल्यास तत्काळ नारळ दिला जातो. काही जण व्यसन सोडण्यासाठीही यात्रेत भाग घेतात व यातील साऱ्यांनी व्यसन सोडल्याची उदाहरणे आहेत.
- वीरेंद्र चव्हाण,
रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com