‘वरचा मजला रिकामा’ दिग्दर्शकाने फुलवलेली संहिता

नरेश पांचाळ
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

माणसांना राहण्यासाठी स्वतःचं घरकुल मिळविणे जितकं कठीण आहे. तितकंच भाडेतत्त्वावर मिळालेली रूम टिकविणे हे कौशल्यच. शहरात नोकरीसाठी गरजूंची संख्या वाढत आहे. भाडेतत्त्वावर मिळालेली रूम टिकविण्यासाठी काय-काय खटाटोप करावा लागतो त्याचे विनोदी ढंगाने जाणारे सुंदर चित्रण आत्माराम सावंत यांच्या लिखाणातून व प्रयोगातून रसिकांना पाहायला मिळाले.

माणसांना राहण्यासाठी स्वतःचं घरकुल मिळविणे जितकं कठीण आहे. तितकंच भाडेतत्त्वावर मिळालेली रूम टिकविणे हे कौशल्यच. शहरात नोकरीसाठी गरजूंची संख्या वाढत आहे. भाडेतत्त्वावर मिळालेली रूम टिकविण्यासाठी काय-काय खटाटोप करावा लागतो त्याचे विनोदी ढंगाने जाणारे सुंदर चित्रण आत्माराम सावंत यांच्या लिखाणातून व प्रयोगातून रसिकांना पाहायला मिळाले. संहिता जुनी असली तरी वेगवान जीवन पद्धतीचा ठाव घेताना राज्य नाट्य स्पर्धेचे दुसरे पुष्प ‘श्रीरंग’ रत्नागिरी संस्थेने गाजवले. ७ कलाकारांनी अभिनयातून साकारलेले सहज सोपे विनोद, हशा आणि टाळ्यांच्या गजरात ‘वरचा मजला रिकामा’ या नाट्यप्रयोगाला रसिकांनी दाद दिली.

काय आहे नाटक ?
शहरात नोकरी धंद्याच्या शोधार्थ येणारा गरजूंचा लोंढा वाढतोच आहे. नोकरी आणि राहण्यासाठी जागा मिळवताना सगळ्यांनाच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक उचापती, कसरती कराव्या लागतात. शहरात मिळालेली वरच्या मजल्यावरची जागा टिकवण्यासाठी या नाटकाचा नायक दिगंबर अनेक खटपटी करतो. घरमालकाला अविवाहित आहे असे सांगतो. पत्नीलाही कल्पना नसते. एके दिवशी त्याचा जीवलग मित्र पोपट. त्यानंतर पत्नी लताही या रूमवर येते आणि सुरू होते ती कसरत. मित्र पोपट, पत्नी लता आणि घरमालकाची मुलगी मंजू यांना दिगंबर थापाबाजीतील कसरतीत सामिल करून घेतो. अखेर घरमालक शंभूराव त्याला घराबाहेर काढायला निघतात. 

याचवेळी घरमालकाचे नोकर नानामामा हे मदतीला धावतात. पत्नी लताचे वडील राहण्यासाठी रूमवर येतात. तेव्हा दिगंबर घरमालक थोडा सायकीक असल्याचे भासवतो. मित्र पोपट पासून मंजूला दिवस गेले आहेत. पत्नी लता बहीण आहे असे सांगून वेळ मारून नेतो. घरमालक शुंभराव दिगंबरची बहीण म्हटल्यावर तिच्याशी लग्न करायचे म्हणतो. उत्तरार्धात मंजूला दिवस गेले नाहीत हे डॉक्‍टरांकडून स्पष्ट होते. तसेच नानामामा, लता आणि मंजू, पोपटही दिगंबरच्या उठाठेवीत सामील असल्याचे समोर येते. अशा रंजक आणि विनोदी कथेला भाग्येश खरे यांच्या दिग्दर्शनने अधिक फुलवले. कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्‍वसंगीतातही नाटकाचा विनोदी बाज संभाळला गेला. सहज सोप्या विनोदाने ‘वरचा मजला रिकामा’ नाटकाने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले.  

 दिग्दर्शकाचे मत
‘श्रीरंग’ संस्था गेली सोळा वर्षे नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या राज्य नाट्य स्पर्धेत गतवर्षी ‘एक्‍झिट’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला होता. सातत्याने विविध विषय घेऊन संस्था काम करीत आहे. या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत विनोदी ढंगाने जाणारे नाटक व्हावे अशी कलाकारांची मागणी होती आणि ती सत्यात उतरली. प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

 पात्र परिचय
दिगंबर- गोपाळ जोशी, पोपट- पराग मुळ्ये, नानामामा- सतीश काळे, मंजू- श्रद्धा मुळ्ये, लता-पल्लवी गोडसे, टूमणे वकील- पुरुषोत्तम केळकर, शंभूराव- प्रकाश केळकर.

सूत्रधार आणि सहाय्य
प्रकाश योजना ः प्रतीक गोडसे, नेपथ्य- सत्यजित गुरव, पार्श्‍वसंगीत- कांचन जोशी, रंगभूषा- उमेश गुरव, वेशभूषा- ज्योती खरे, सूत्रधार- प्रतिभा केळकर, 

आजचे नाटक 
काही अपरिहार्य कारणामुळे (ता. १०) रोजी होणार नाटक रद्द झाले असल्याचे समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी सांगितले