धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्‍छता मोहीम

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्‍छता मोहीम

रत्नागिरी - शहरातील विविध शासकीय कार्यालये व आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करताना डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने १५० टन ओला कचरा व ५० टन सुका कचरा संकलित केला. गांधी जयंतीनिमित्त आज सकाळी ७ ते ११ या वेळेत २५०० श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. आता नागरिकांनीही कचरा बाहेर न टाकता ही मोहीम यशस्वी करण्याची गरज आहे.

भारत सरकारचे स्वच्छतादूत पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशानुसार व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा सत्र न्यायालय, पोलिस अधीक्षक कार्यालय व मुख्यालय, उत्पादन शुल्क, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बसस्थानक, रेल्वेस्थानक आवार आणि भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली. साळवी स्टॉप ते बसस्थानक दुतर्फा रस्ता स्वच्छ करण्यात आला.

नगरपालिकेने हा कचरा उचलण्याची व्यवस्था केली. गतवर्षीही प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी शहरात स्वच्छता अभियान राबवले होते. रस्त्यांच्या दुतर्फा प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आढळला. प्लास्टिक बाटल्या, पिशव्यांचा खच पडला होता. तसेच पावसामुळे वाढलेले रानही या वेळी साफ करण्यात आले. यंदाही शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस, नगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेवकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

चिपळूण - धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शहरातील नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले होते. 

शहर स्वच्छ करताना नेहमी पालिकेचे सफाई कामगार दिसतात. आज मात्र वेगळे चित्र दिसले. पालिकेत शहराचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ सफाई कामगारांच्या मदतीला उतरले. सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील महिला- पुरुष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्या हस्ते स्वच्छता मोहीमेला सुरवात झाली.

लोकप्रतिनिधी, श्री सदस्य, पालिकेचे सफाई कामगार व शहरातील नागरिकांनी पालिकेच्या आवाराची स्वच्छता केली. शहरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांच्या कडेला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. सार्वजनिक ठिकाणी हीच अवस्था होती. श्री सदस्यांकडून वर्दळीच्या मार्गावर स्वच्छता करण्यात आली. शहरातील पाखाड्या, रस्ते स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्यात आला. रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत, झाडी काढण्यात आली. त्यासाठी लोकांनी घरातूनच साहित्य आणले होते. स्वच्छतेमुळे रस्त्या बरोबरच साईडपट्ट्याही चकाचक झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com