भोंदूबुवा पाटीलला जामिनानंतर अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - के. सी. जैन नगरमधील मंदिरातून निघाला आणि पोलिसांच्या दृष्टीस पडला. त्याबरोबर पाटील या भोंदूबुवाच्या हाती बेड्या पडल्या. त्याला जामीन मिळाला. मात्र पुन्हा जादूटाणा अधिनियमाअंतर्गत पुन्हा पाटीलबुवाला ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

रत्नागिरी - के. सी. जैन नगरमधील मंदिरातून निघाला आणि पोलिसांच्या दृष्टीस पडला. त्याबरोबर पाटील या भोंदूबुवाच्या हाती बेड्या पडल्या. त्याला जामीन मिळाला. मात्र पुन्हा जादूटाणा अधिनियमाअंतर्गत पुन्हा पाटीलबुवाला ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

मंगळवारी (ता. १९) रात्री गस्त घालणाऱ्या पथकाला तो दिसला. पोलिस त्याला पूर्वापार ओळखत असल्याने तो आयताच हातात गावला. पाटीलबुवाला शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मध्यरात्री ताब्यात घेतले. महिलेला अश्‍लील शिवीगाळ करत मनास लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता. तो गेले दोन दिवस बेपत्ता होता. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली. मात्र हा दिलासा अल्पकाळच ठरला. 

श्रीकृष्ण अनंत पाटील (वय ६०, रा. झरेवाडी) व जयंत रावराणे (रा. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ८ सप्टेंबर २०१६ ला सकाळी दहाच्या सुमारास झरेवाडी येथील पाटीलबुवाच्या मठात घडली होती. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला झरेवाडी येथील पाटीलबुवाच्या मठात गेली, तेव्हा त्याने महिलेला अश्‍लील शिवीगाळ करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. शिवीगाळ का करता असे पाटीलबुवाकडे महिलेने विचारणा केली, तेव्हा संशयित जयंत रावराणे याने तुम्हाला काय करायचे आहे ते करून घ्या, असे सांगितले. याप्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २०) तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी दोघा संशयितांवर महिलेशी अश्‍लील वर्तन व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पाटीलबुवासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ क्‍लिप आणि माहिती तसेच शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीआधारे पोलिस तपास करीत होते. काल मध्यरात्री शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन ढेरे व सहायक पथकाने मारुती मंदिर परिसरातील के. सी. जैननगर येथे गस्त घालत असताना संशयित पाटीलबुवाला अटक केली. त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला होता. 

कडक कारवाईची मागणी
पुढील तपासासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे एस. एन. सूर्यवंशी यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने पाटीलबुवाची जामीनपात्र गुन्हा असल्याने १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. पाटीलबुवा विरोधात अनेक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन बुवाविरोधात कारवाईची मागणी केली होती. या आधारावर ग्रामीण पोलिस निरीक्षक विभूते यांनी तक्रारदार होऊन जादूटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

रविवारी बीअर, खंबा आणि चिकन-मटण
रत्नागिरी तालुक्‍यातील झरेवाडी येथील स्वयंघोषित स्वामींचा अवतार म्हणवणारा श्रीकृष्ण पाटील ऊर्फ पाटील महाराजाचे अनेक कारनामे पुढे आले आहेत. हा ‘स्वामी’ दर रविवारी तीन बीअर, १ खंबा रिचवत होता. चकना म्हणून चिकन-मटण तसेच जेवणाला बिर्याणी लागत होती. कहर म्हणजे पाटील महाराज आंबट शौकीन होता. भक्त म्हणून येणाऱ्या महिलांपैकी काहींकडे बघण्याची त्याची नजर संशयास्पद होती, असा गौप्यस्फोट पाटील महाराजांचा १८ वर्षे निस्सीम सेवक असलेल्या सूर्यकांत नारायण सागवेकर (रा. झरेवाडी) यांनी केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच त्यांनी ही स्फोटक माहिती दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, झरेवाडीतील ‘स्वामी’ पाटील महाराजाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात काल (ता. २०) गुन्हा दाखल झाला. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न करणारे वर्तन त्यांनी केल्याचा हा गुन्हा होता. पोलिसांनी त्याला काल मध्यरात्री अटक केली. झरेवाडीतील ग्रामस्थांना याची माहिती मिळताच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी शेकडोंच्या संख्येने ग्रामीण पोलिस ठाण्यात गोळा झाले होते. बाबाविरुद्ध आमच्या तक्रारी असल्याचे ते पोलिसांना सांगत होते. त्यांनी पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांना निवेदन सादर केले.

यावेळी पाटील बाबाच्या लीला अगदी जवळून पाहिलेला आणि अनुभवलेल त्यांचा निस्सीम भक्त सूर्यकांत सागवेकर यांनी गेल्या १८ वर्षांमध्ये पाटील बुवांनी केलेल्या करामतींचा पाढा वाचला. पाटील बुवा जेव्हा झरेवाडीत आला होता, तेव्हा मी त्याचा एकमेव भक्त होतो. मी गावामध्ये जाऊन बुवाविषयी सांगून तिथे त्याचे नाव केले. गावातील लोकांना एकत्र केले. मठ उभारण्यासाठी २ जागा बघितल्या. दोनपैकी जी फुकट मिळाली, त्या जागेवर सुरवातील छोटी झोपडी उभारून पाटील बुवाने आपले बस्तान मांडले. हळूहळू त्याचा महिमा वाढू लागला. आम्ही त्याला देव मानत होतो; परंतु पाटील बुवाला आमची किंमत राहिली नाही. शिवीगाळ करून आमचा वारंवार पाणउतारा करू लागला. दोन वर्षांपासून आम्ही त्याच्यापासून बाजूला झालो. पाटील बुवाच्या करामती लाजीरवाण्या आहेत. बेरोजगार असल्यामुळे पाटील बुवाची सेवा करीत होतो. दोन वेळा जेवण आणि थोडाफार पैसा मिळायचा. भक्तगण पैसा गोळा करतात, त्यातील काही वाटा पाटील बुवाला भक्त देत, असेही सागवेकर यांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

अवैज्ञानिक दावे

मृत मुलाला जिवंत केल्याचा तसेच अंध व्यक्तीला दृष्टी दिल्याचा अवैज्ञानिक दावा पाटील स्वामी करी. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे दावे आहेत. मी ईश्‍वराचा अवतार आहे. स्वामी समर्थांचा अवतार आहे, असेही तो म्हणतो. या व्हिडिओत महिलांना अश्‍लील शिवीगाळ केली आहे, असे विविध संस्थांनी दिलेल्या निवेदनात निदर्शनास आणले आहे.

मे २०१३ ला पोलिसांनी वाचवले
८ मे २०१३ ला ‘स्वामी’चे विषय तंटामुक्त समितीच्या सभेमध्ये आले. पाली पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पीएसआय व्ही. एस. कुलकर्णी सभेला हजर होत्या. पोलिसांनी ग्रामस्थांना नव्हे, तर मठातील लोकांना सहकार्य केले आणि सभेत तक्रार करण्याचा झरेवाडी ग्रामस्थांच्या मुख्य हेतू असफल झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी मठ विषयाला स्थगिती दिली, असे ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत पाटील बाबावर कार्यवाही करून मठ कायमस्वरूपी बंद करावा, अशीही मागणी गावप्रमुख राजेश अनंत कळंबटे, मानकरी मधुकर कळंबटे, नारायण कळंबटे, अनंत गोताड, अनंत शितप, सूर्यकांत सागवेकर आदींच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केली आहे.

Web Title: ratnagiri news swami patil arrested