‘स्वामी’ भक्तांचे संगमेश्‍वरात नेटवर्क

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

देवरूख - सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या रत्नागिरीजवळच्या त्या ‘स्वामी’चे संगमेश्‍वर तालुक्‍यातही भक्तांचे मोठे नेटवर्क असल्याचे उघड होत आहे. बाबाचे कारनामे सोशल मीडिया तसेच माध्यमांतून उघड झाल्यानंतरही बुवाचे काही अंध भक्‍त इतरांना घाबरवत आहेत. त्याचा भक्तांवर अजूनही प्रभाव असा आहे, की ते त्याच्या ताकदीचे नवनवीन किस्से ऐकवत आहेत. 

देवरूख - सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या रत्नागिरीजवळच्या त्या ‘स्वामी’चे संगमेश्‍वर तालुक्‍यातही भक्तांचे मोठे नेटवर्क असल्याचे उघड होत आहे. बाबाचे कारनामे सोशल मीडिया तसेच माध्यमांतून उघड झाल्यानंतरही बुवाचे काही अंध भक्‍त इतरांना घाबरवत आहेत. त्याचा भक्तांवर अजूनही प्रभाव असा आहे, की ते त्याच्या ताकदीचे नवनवीन किस्से ऐकवत आहेत. 

रत्नागिरी शहरापासून नजीकच झरेवाडी येथे मठ स्थापन करून सध्या हजारो भाविकांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि वास्तवात ओसाड गावचा ‘पाटील’ असलेल्या त्या बुवाने सोशल मीडियातून त्याचे प्रताप उघड होताच मठ सोडून पळ काढला होता; मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. या व्हिडिओनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह आणखी काही समित्या जाग्या झाल्या असून त्याही संघर्षासाठी उभ्या आहेत.

या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर या ‘बुवा’चे संगमेश्‍वर तालुक्‍यातही मोठे नेटवर्क असल्याचे पुढे आले आहे. संगमेश्‍वर आणि रत्नागिरीच्या हद्दीजवळच बुवाचा मठ असल्याने दर गुरुवारी तालुक्‍यातून हजारो भाविक या ‘स्वामी’चे दर्शन घेण्यासाठी पायी जातात. गेल्या आठवड्यात ‘स्वामी’चे कारनामे उघड झाल्यावर आणि पोलिसांनी त्याला चतुर्भूज केल्यावर आज गुरुवारी भाविकांना कोणत्या बुवाला गाठायचे आणि गाठायचे तर कोठे, असा प्रश्‍न पडला.

स्वतःला स्वामी समर्थांचा अवतार समजणाऱ्या या बुवाची नोकरी यापूर्वी संगमेश्‍वर तालुक्‍यात होती. समाजाचे ‘संरक्षण’ करणाऱ्या खात्यात ‘खाकी’ वर्दीत हा बुवा सारथ्याचे काम करीत होता. यामुळे संगमेश्‍वर तालुक्‍यात त्याची चांगलीच ओळख होती. यातून तो जेव्हा प्रसिद्ध बुवा म्हणून उदयास आला, तेव्हा तालुक्‍यातील अनेक राजकीय पुढारी त्याच्याकडे धाव घेऊ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजूनही तालुक्‍यातील काही राजकीय पुढारी या स्वामीच्या मठात त्याचा कृपाप्रसाद मिळवण्यासाठी खुलेआम त्याचे पाय धरतात. गावागावातून दर गुरुवारी व्यसनमुक्‍ती करण्याच्या उद्देशाने ‘स्वामी’च्या मठात जाणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असून पांढऱ्या अगरबत्तीची उदी देऊन या बुवाने अनेकांची दारू सोडविल्याचा दावा भक्‍त छातीठोकपणे करीत आहेत. 

तालुक्‍यात गेल्या तीन वर्षात झालेल्या अनेक धार्मिक कार्यक्रमांना हा ‘स्वामी’ प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असल्याच्या धक्‍कादायक प्रकाराची आता चर्चा सुरू झाली. भर कार्यक्रमात अश्‍लील बोलूनही त्याचे अंध भक्‍त त्याची शिवराळ भाषा खपवून घेतात, एवढी त्याने भक्तांवर मोहिनी घातली होती. बुुवाबाजीतील ही पाटीलकी आता संपुष्टात आली.