तारखा लिहिताना शिक्षकांकडूनच चुका 

राजेश कळंबटे
रविवार, 9 जुलै 2017

विद्यार्थ्यांसारखी गडबड 
विद्यार्थ्यांना रांगेची शिस्त लावणाऱ्या शिक्षकांकडूनही चुका होऊ शकतात हे आज स्पष्ट झाले. डाटा एंट्री ऑपरेर्टसना संगणक उपलब्ध करून देण्याचे काम अधिकारी करीत होते. शिक्षकांना थोडे थांबण्याचीही उसंत नव्हती. आपला पहिला नंबर लागावा यासाठी ते धडपडत होते. त्यामुळे दरवाज्यात आत-बाहेर जाण्यासाठीही जागा नव्हती. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना मुख्याध्यापकाच्या भूमिकेत जाऊन शिक्षकांना समज द्यावी लागली. 

रत्नागिरी : प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सरल प्रणालीवर भरलेल्या प्रस्तावांमध्ये सेवेत रुजू झाल्याची तारीख आणि शाळेत रुजू झालेल्या तारखा शिक्षकांनीच चुकीच्या भरल्या. त्या सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने शनिवारी सर्व शिक्षकांना जिल्हा परिषदेत बोलावले होते. या एका चुकीने बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत मोठे फेरफार होतील. त्यामुळे या शिक्षकांना त्याची किंमत मोजावी लागेल. शिवाय अन्य शिक्षकांनाही त्याची झळ पोचणार आहे. 

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी सरकारने ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी "सुगम' आणि "दुर्गम' असे दोन भाग तयार केले आहेत. अवघड क्षेत्रातील शाळा ठरविण्यासाठी गेले दोन महिने शिक्षण विभाग काम करीत होता. ही यादी तयार करतानाच सरल प्रणालीवर शिक्षकांची माहिती भरण्याचे काम सुरू होते. सेवेत रुजू झालेली तारीख, सध्या कार्यरत शाळेत नियुक्‍ती मिळालेली तारीख आणि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये काम केल्याचा कालावधी अशी माहिती "ट्रान्सफर' या पोर्टलवर भरण्याचा आदेश दिले होते.

जिल्ह्यातील आठ हजारपैकी पाचशेहून अधिक शिक्षकांनी तारखांमध्ये घोळ केला आहे. याची आठवण त्यांना काही दिवसांपूर्वी झाली. त्या बदलण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज आले आहेत. 

शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनीही शिक्षकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ऑनलाइन विनंती अर्ज मागविले. विनंती केलेल्यांसाठी आज शिक्षणाधिकाऱ्यांचे वेब अकाउंट खुले केले. मंडणगडपासून राजापूरपर्यंतच्या शिक्षकांनी गर्दी केली होती. जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सेवा ज्येष्ठतेनुसार यादी निश्‍चित केली होती; परंतु अनेक शिक्षकांच्या प्रस्तावातील चुका पुढे आल्या. त्यामुळे यादीत मोठे फेरबदल होणार आहेत. पहिल्या क्रमांकावरचा शिक्षक अन्य क्रमांकावर जाईल. 