अपघातप्रकरणी चालकास 10 वर्षे सक्तमजूरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

खेड - जगबुडी नदीवरील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीची बस पुलावरून नदीत पडून 37 प्रवाशांचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्या गाडीचा चालक संताजी कैलास किरदत्त (वय 44, रा. सातारा) याला मंगळवारी खेडच्या जिल्हा न्यायालयाने दहा वर्षाची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

हा अपघात 19 मार्च 2013 ला पहाटे सव्वातीन वाजता झाला होता. ही बस (क्र.एम.एच.04 एफसी 5995) मडगावहून (गोवा) मुंबईला जात होती. बस बेदरकारपणे, हयगयीने तसेच चुकीच्या बाजूने चालवून बसमधील प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत होऊ याची जाणीव असतानाही बस भरधाव वेगाने चालवून, अनेक प्रवासी बस हळू चालवा अशी सूचना देत असतानाही त्याकडे कानाडोळा करून हा अपघात करून 37 प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप चालकावर होता.

अपघातात बसमधील 14 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले होते. आरोपीविरुद्ध कलम 304 तसेच मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत दोषारोपपत्र खेडच्या जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. तपासिक अंमलदार म्हणून तत्कालीन पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी काम पाहिले होते. खटल्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली.

आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात आरोपीला दोन लहान मुले आहेत. तसेच त्याचा पहिलाच गुन्हा आहे. म्हणून सौम्य शिक्षा देण्याची विनंती करण्यात आली होती. त्याचे खंडन सरकारी वकिलांनी केले. या अपघातात 37 निरपराध माणसांचा मृत्यू झाला. तसेच समाजावर विपरित परिणाम करणारा गुन्हा असल्याचे निदर्शनास आणून दिले. सरकार पक्षातर्फे ऍड.मेघना नलावडे यांनी काम पाहिले.